मुंबई -मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC)च्या नवीन क्लब हाऊस, बँक्वेट हॉलच्या (banquet hall) प्रस्तावाला मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation)परवानगी मिळाली आहे. घोड्यांच्या शर्यती आणि संबंधित उपक्रमांसाठी जुलै २०२४ साली आरडब्ल्यूआयटीसीला भाड्याने दिलेल्या ९३ एकर जागेपैकी ३२ एकर जमीन प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे.
रेस कोर्स आर्किटेक्ट्सच्या प्रस्तावित १७००० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या क्लबहाऊसमध्ये २ बेसमेंट पार्किंग लेव्हल आणि ७ मजले असतील. यामध्ये वरच्या ५ मजल्यांमध्ये १७७ लॉजिंग रूम असतील. तर पहिल्या मजल्यावर बेकरी, डिपार्टमेंट स्टोअर, कार्ड आणि टेबल टेनिस रूम, बँक्वेट हॉल, प्ले एरिया, जलतरण तलाव आणि स्वयंपाकघर असेल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, बँक्वेट हॉल, स्वयंपाकघर आणि पॅन्ट्रीसह दुसरे क्लबहाऊस देखील असेल. दरम्यान, पर्यावरण कार्यकर्ते झोरू भाथेना यांनी या प्रकल्पावर टीका करताना म्हटले की, रेसकोर्सचा हेतू केवळ घोड्यांच्या शर्यती व त्याच्या देखभालीसाठी होता. अतिरिक्त एफएसआय मागणे म्हणजे सार्वजनिक जमिनीचा उघड उघड व्यावसायिक गैरवापर आहे. आम्ही पूर्वी १.३३ एफएसआयच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला होता, जो नंतर ०.३ पर्यंत कमी करण्यात आला.