सोलापूर– पंढरपूरला निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण (Gol Ringan)आज खुडूस परिसरात भक्तीमय वातावरणात पार पडले. ‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हे रिंगण पार पडले.
पालखी रिंगण तळावर दाखल झाली. सेवेकऱ्यांच्या खांद्यावरून माऊलींची पालखी सन्मानपूर्वक रिंगण स्थळी आणण्यात आली. राजाभाऊ चोपदारांनी रिंगण लावून घेतले, तर शितोळे सरकार यांनी पाहणी केली. रिंगणाची सुरुवात भोपळे दिंडीने जरीपताका घेऊन प्रदक्षिणा घालून झाली. त्यानंतर अश्वांना माऊलींच्या पादुकांवरील हार घालून बुक्का लावण्यात आला. स्वाराचा अश्व व माऊलींचा अश्व रिंगणात चौखूर उधळत दौडले. त्या क्षणी जणू भक्तीचा झंकार आणि परब्रह्माची चाहुल रिंगणात उतरली होती. यानंतर मानाच्या दिंड्या रिंगणामध्ये दाखल झाल्या. उड्या, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात पावलांचा खेळ रंगला. टाळ-मृदंगाची जुगलबंदी आणि एकाच लयीत पडणाऱ्या पावलांचा ठेका पाहण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. महिलांनी वीणेकरी म्हणून तुळशी वृंदावन घेऊन सहभाग घेतला. पखवाज वादक, टाळकरी यांनी टाळांच्या गजरात भक्तीचा उत्सव खुलवला. ‘माऊली-माऊली’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.