Dalai Lama Succession | तिबेटचे धर्मगुरू नेते दलाई लामा यांनी लवकरच पुढील वारसदार कोण असेल याची निवड केली जाणार असल्याची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या निधनानंतर त्यांना वारसदार मिळेल, ज्यामुळे 600 वर्षे जुनी दलाई लामा संस्था पुढेही सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे.
दलाई लामांच्या घोषणेमुे जगभरातील बौद्ध अनुयायांना आणि तिबेटी जनतेला दिलासा मिळाला आहे हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत धार्मिक नेत्यांच्या बैठकीत व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी ही घोषणा केली. मात्र, चीनने पुढील धर्मगुरूंच्या निवडीसाठी सरकारी मान्यता आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
दलाई लामा यांनी सांगितले की, गेल्या 14 वर्षांपासून तिबेटी डायस्पोरा, हिमालयीन प्रदेश, मंगोलिया, रशिया आणि चीनमधील बौद्ध समुदायांकडून दलाई लामा परंपरा सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. “विशेषतः तिबेटमधील लोकांनी विविध मार्गांनी ही विनंती केली आहे,” असे त्यांनी धर्मशाळेत सांगितले. भारतात ते 1959 पासून निर्वासित म्हणून राहत आहेत. “या सर्व मागण्यांमुळे मी पुष्टी करतो की, दलाई लामा निवडण्याची परंपरा सुरू राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले. ते येत्या 6 जुलैला 90 वर्षांचे होणार आहेत.
चीनची प्रतिक्रिया
चीनने दलाई लामांच्या वक्तव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दलाई लामांचा पुनर्जन्म सरकारने मंजूर करणे आवश्यक आहे., असे चीनने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, पुनर्जन्माची निवड 18व्या शतकातील किंग राजवंशाच्या ‘सोन्याच्या कलश’ पद्धतीने आणि सरकारच्या मान्यतेने होईल. “चीनी सरकार धार्मिक स्वातंत्र्याचे धोरण राबवते, पण तिबेटी बुद्धांच्या पुनर्जन्मासाठी नियम आहेत,” असे त्या म्हणाल्या.
दलाई लामांचा संदेश
चीनच्या दाव्यानंतर दलाई लामांनी देखील प्रत्युत्तर दिले. त्यांनी ठामपणे सांगितले की, 15व्या दलाई लामांची निवड फक्त गाडेन फोड्रँग ट्रस्टच्या अधिकारात आहे. “इतर कोणालाही हस्तक्षेपाचा अधिकार नाही,”
तिबेटी संघर्ष आणि दलाई लामांचा वारसा
1959 मध्ये चीनने ल्हासा येथील उठाव चिरडल्यानंतर दलाई लामा आणि हजारो तिबेटी भारतात निर्वासित म्हणून आले. नोबेल शांतता पुरस्कार विजेते दलाई लामा तिबेटला अधिक स्वायत्ततेच्या मागणीसाठी अहिंसक मार्गाने लढत आहेत. 2011 मध्ये त्यांनी राजकीय सत्ता निर्वासित सरकारला सोपवली, पण आध्यात्मिक नेते म्हणून त्यांचा प्रभाव कायम आहे. अनेक तिबेटींना भीती आहे की, चीन स्वतःचा वारसदार नेमून तिबेटवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल.