१०० वर्षे जुने जिमी बॉय कॅफे बंद झाले! ग्राहकांमध्ये नाराजी

Jimmy Boy cafe

मुंबई -मुंबईतील फोर्ट येथील हॉर्निमन सर्कलजवळ असलेले ‘जिमी बॉय’ (Jimmy Boy cafe) हे आयकॉनिक पारशी कॅफे आता बंद झाले आहे. या कॅफेची इमारत जीर्ण अवस्थेत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. काही महिन्यांनी या कॅफेचा १०० वा वर्धापनदिन (100th anniversary)होता, मात्र त्या पूर्वीच कॅफे बंद झाल्याने आणि येथील प्रसिद्ध कीमा पाव (Keema Pav), बन मस्का, इराणी चहा ( Irani Chai), ऑम्लेट पाव, मावा केक (Mawa Cake) आणि मावा समोसा यासारख्या पारंपरिक पारशी पदार्थांचा आस्वाद आता घेता येणार नाही म्हणून ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या कॅफेची स्थापना (founded)१९२५ साली कॅफे इंडिया या नावाने जमशेद आणि बोमन इराणी या बंधूंनी केली. १९९९ मध्ये जमशेद यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अस्पी इराणी यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली म्हणून याचे नाव जिमी बॉय असे ठेवले. हे कॅफे तीन पिढ्यांपासून पारशी खाद्यसंस्कृती जपत आहे. येथील सगळेच पदार्थ लोकप्रिय आहेत. यंदा सप्टेंबर महिन्यात या कॅफेचा शतकमहोत्सव साजरा होणार होता. मात्र, २० जून रोजी हे कॅफे असलेल्या चारमजली इमारतीत मोठ्या भेगा दिसल्याने मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याची माहिती देण्यात आली. त्यानुसार २१ जून रोजी महापालिका कायदा १८८८ च्या कलम ३५४ अंतर्गत मालक आणि भाडेकरूंना इमारत त्वरित रिकामी करण्याचे व पाडण्याचे आदेश दिले. यामुळे हा कॅफे बंद करावे लागला. कॅफेचे संचालक शेरझाद इराणी यांनी सांगितले की, कॅफे तात्पुरते बंद केला आहे. माहीम येथील टेकअवे आउटलेट आणि नेव्ही नगरमधील कॅफे ऑलिव्ह ग्रीन येथे जिमी बॉयचे पदार्थ उपलब्ध आहेत. ऑनलाइन डिलिव्हरीद्वारेही ते पुरवले जातील.