गोपीचंद पडळकरांच्या भावावर वृद्धेकडून फसवणुकीचा आरोप

Gopichand Padalkar's brother accused of cheating by the old woman

मुंबई – जत विधानसभाचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar)यांच्या भावाने पडळकरवाडी (Padalkarwadi)गावातील विठाबाई पडळकर या ८२ वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. विठाबाई पडळकर यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी आज विधानभवनाबाहेर आंदोलन केले. या प्रकरणी मदत न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा विठाबाई यांच्या कुटुंबियांनी दिला आहे.

विठाबाई (Vithabai)यांची १७ एकर जमीन ही गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर याने फसवणूक करून हडप केली. पोलीस या प्रकरणात कारवाई करत नाहीत. तसेच गोपीचंद पडळकर भेटीसाठी वेळ देत नाही, असा आरोप विठाबाई यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाई यांनी जमीन हडप केल्याबद्दल आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, माझे पती बापू पडळकर यांचा १० वर्ष पूर्वी मृत्यू झाला. माझे वय ८२ वर्षे असून मला लिहिता, वाचता येत नाही.मला डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही. माझे दोन्ही दीर मयत असून आमचे एकत्र कुटुंब आहे. आमच्या शेतजमिनीचे वाटप झालेले नाही. माझा सांभाळ माझे पुतणे करतात. आणेवारीत माझ्या नावे १७ एकर जमीन आहे. ही जमीन माझे पुतणे कसतात. पण ही जमीन फसवणुकीने हडप केली आहे.

विठाबाईचे पुतणे राजेंद्र पडळकर म्हणाले की,गावातील पोलीस पाटील आणि त्याच्या साथीदारांनी विठाबाई यांचा अंगठा घेतला. आजीच्या नावावर असलेली १७ एकर जमीन ब्रह्मानंद पडळकर याने नावावर करून घेतली. २४ लाख दिल्याचे खोटे पुरावे त्यांनी दिले. आजीला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. ३ एप्रिलला हा प्रकार घडला. आम्ही ३ महिने झाले दाद मागत आहोत. पण राजकीय दबावामुळे कारवाई करण्यात आली नाही.

या आरोपांवर गोपीचंद पडळकर म्हणाले की, कोणाची तरी जमीन हडप करावी, अशी वेळ माझ्या भावावर आलेली नाही. आमचा अशा कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही. आमच्याकडे आमच्याच जमिनीवर पीक घेण्यासाठी वेळ नाही. ज्यांना अडचण आहे त्यांनी माझ्या घरी घेऊन भेट घ्यावी. आजीच्या कुटुंबातील एक ही व्यक्ती आतापर्यंत मला भेटण्यासाठी आलेली नाही.