मुंबई – मीरारोड (Mira Road)येथील एका अमराठी व्यावसायिकाला (businessman)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील अमराठी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा देखील काढला. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याने भाजपाला राग आला आहे. हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नाही तर भाजपाचा (BJP) मोर्चा होता असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav)यांनी आज पत्रकार परिषद घेत केला.
मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला मनसेने महाराष्ट्रात कोणती भाषा वापरली जाते असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने सर्व भाषा बोलल्या जातात. मराठी भाषा बोलण्याची गरज काय ? असे उत्तर दिल्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज स्थानिक व्यापाऱ्यांनी सेवेन स्कूल येथून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला.भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे आपले एक निवेदन दिले.या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली.
अविनाश जाधव म्हणाले की, आज जिथे बंद पाळण्यात आला तो एक लहानसा परिसर आहे. तेथील काही व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला. आजचा मोर्चा हा स्थानिक व्यापाऱ्यांचा नव्हता तो भाजपाचा मोर्चा होता. भाजपामधील येथील नेते, पदाधिकारी, वकील आणि नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातील काही लोक होते.भाजपाने मराठी माणसाविरोधात काढलेला मोर्चा म्हणजे मराठी माणसांचा अपमान आहे. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याचा राग भाजपाच्या मनात आहे. भाजपा नेत्यांनी दुकानदाराला मारहाण करतानाचा फक्त ४० सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल केला. त्याआधी आणि नंतर त्या ठिकाणी काय झाले हे भाजपाने जाणूनबुजून दाखवले नाही.प्रत्यक्ष हकिगत अशी आहे की, हिंदी सक्तीचे जीआर रद्द केल्याचा आनंद मनसेचे कार्यकर्ते साजरा करत होते. पदाधिकाऱ्यांनी ज्या दुकानदाराला मारहाण केली, त्याच्याच दुकानातून पेढे विकत घेतले आणि आजुबाजूच्या लोकांना पेढे वाटत होते. ते पाहून या दुकानदाराने विचारले की, काय सुरु आहे? तेव्हा पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य सरकारने हिंदीचा जीआर रद्द केला, त्याच्यामुळे आम्ही आनंद साजरा करत आहोत. त्यावर या दुकानदाराने म्हटले की, पण आमच्याकडे तर हिंदीच चालते. त्यावर पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, तुम्ही राहताय कुठे, महाराष्ट्रात ना? मग या दुकानदाराला महाराष्ट्राची भाषा विचारण्यात आली. त्या दुकानदाराला याचे उत्तरही माहिती नव्हते. मग अशा लोकांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर द्यायची नाहीत का? काल दुकानदार माझ्याकडे आला होता. दुकानदाराने माफी मागितली होती आणि मोर्चा निघणार नव्हता. आजचा मोर्चा हा भाजपाने स्वतःच्या फायद्यासाठी केला होता.