Home / महाराष्ट्र / ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला जाणार का? शरद पवार म्हणाले…

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला जाणार का? शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar | राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती रद्द केल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या ५...

By: Team Navakal
Sharad Pawar

Sharad Pawar | राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती रद्द केल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या ५ जुलैला मुंबईतील वरळी डोम येथे एकत्रित ‘विजयी मेळावा’ साजरा करणार आहेत. सुरुवातीला हिंदी सक्तीविरोधात काढण्यात येणारा हा मोर्चा आता ‘विजयी मेळाव्या’त रूपांतरित झाला आहे.

या मेळाव्या च्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ‘ठाकरे बंधू’ एकत्र येत आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही नेत्यांचे एकत्र येणे महत्त्वाचे मानले जात आहे.

शरद पवार गैरहजर, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

या मेळाव्यात महाविकास आघाडीतील इतर पक्षही सहभागी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ते या मेळाव्यात सहभागी होणार नाहीत, कारण त्यांचे त्या दिवशी नियोजित कार्यक्रम आहेत. “मी त्या मेळाव्याला जाणार नाही. माझे कार्यक्रम दुसरीकडे आहेत,” असे पवारांनी स्पष्ट केले.

मात्र, त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या वतीने मेळाव्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. “आमचे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल मला भेटले होते. ते म्हणाले होते की, या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांचा निर्णय हा आम्हाला शिरसावंद्य असतो,” असे पवार म्हणाले. यामुळे शरद पवार उपस्थित राहणार नसले तरी राष्ट्रवादीचा या कार्यक्रमाला पाठिंबा स्पष्ट झाला आहे.

‘मराठी माणसाचा विजय’: ठाकरे बंधूंचा संदेश

दरम्यान, हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून विजयी मेळावा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दूरध्वनी करून या मेळाव्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. याची माहिती स्वतः राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

राज ठाकरे यांनी या मेळाव्याबाबत स्पष्ट केले की, याला कोणतेही पक्षीय लेबल लावू नये. “हा मराठी माणसाचा विजय आहे, त्यामुळे मेळावा मराठी माणसाचा आहे,” असे ते म्हणाले. मराठी भाषा या विषयावर कोणाकडूनही तडजोड होता कामा नये यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला मिळालेले नसल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती की, “आम्हाला अजून तसे काही निमंत्रण मिळालेले नाही किंवा सांगण्यात आलेले नाही. कदाचित हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा ‘इव्हेंट’ असू शकतो.”

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या