रशियाचा मोठा निर्णय, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणारा ठरला पहिला देश

Russia Recognition Taliban Government

Russia Recognition Taliban Government | अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला (Taliban Government) अधिकृत मान्यता देणारा रशिया (Russia) हा जगातील पहिला देश ठरला आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याला “धाडसी निर्णय” म्हणत याबाबतची घोषणा केली.

काबुलमध्ये झालेल्या बैठकीनंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि विशेष प्रतिनिधींनी या निर्णयाची पुष्टी केली. ही घटना जागतिक राजकारणात महत्त्वाची ठरली आहे, कारण अद्याप इतर देशांनी तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाही.

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी आणि रशियाचे राजदूत दिमित्री झिरनोव्ह यांच्या काबुलमधील बैठकीनंतर ही घोषणा झाली. मुत्तकी यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले, “रशियाचा हा धाडसी निर्णय इतर देशांना मार्ग दाखवेल. मान्यतेची प्रक्रिया आता सुरू झाली आहे, आणि रशिया सर्वांच्या पुढे आहे.” तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झिया अहमद टकल यांनीही रशिया हा ‘इस्लामिक अमिरात’ला मान्यता देणारा पहिला देश असल्याचे सांगितले.

रशियाच्या विशेष प्रतिनिधी झमीर काबूलॉव्ह यांनी सांगितले की, मॉस्कोने तालिबान सरकारला मान्यता दिली आहे. यामुळे अफगाणिस्तान आणि रशिया यांच्यातील राजनैतिक संबंधांना नवे बळ मिळण्याची शक्यता आहे.

चीन, पाकिस्तान आणि इतर काही देशांमध्ये तालिबानचे राजदूत कार्यरत आहेत, परंतु या देशांनी ‘तालिबान सरकारला’ला अधिकृत मान्यता दिलेली नाही. रशियाच्या या पावलामुळे इतर देशांवर तालिबान सरकारला मान्यता देण्याचा दबाव वाढू शकतो.