NC Classic 2025 : भालाफेकचा बादशाह नीरज चोप्रा पुन्हा विजयी, पहिल्या ‘एनसी क्लासिक’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

NC Classic 2025

NC Classic 2025 | भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने बेंगळूरुतील श्री कांतीरवा स्टेडियमवर आयोजित ‘नीरज चोप्रा क्लासिक 2025’ (Neeraj Chopra Classic 2025) स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध करत सुवर्णपदक जिंकले. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 86.18 मीटर भाला फेकत विजेतेपद मिळवले.

भारतातील पहिल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर गोल्ड लेव्हल स्पर्धेने ऍथलेटिक्सच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. नीरजने स्वतः या स्पर्धेचे जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स आणि ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियासोबत सह-आयोजन केले होते. या पहिल्याच ‘नीरज चोप्रा क्लासिक 2025’ स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावले आहे.

नीरजने पहिल्या प्रयत्नात फाऊल केला, पण दुसऱ्या प्रयत्नात 82.99 मीटर फेक करत आघाडी घेतली. श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने तात्पुरती आघाडी घेतली, पण नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 86.18 मीटर फेक करत विजेतेपद खेचून आणले. त्याच्या शेवटच्या दोन प्रयत्नांमध्ये 84.07 आणि 82.22 मीटर फेक झाली.

केनियाचा ज्युलियस येगो 84.51 मीटरसह दुसऱ्या, तर रुमेश पाथिरागे 84.34 मीटरसह तिसऱ्या स्थानावर राहिला. भारताचा सचिन यादव 82.33 मीटरसह चौथा, तर जर्मनीचा थॉमस रोहलर 75.85 मीटरसह 11 व्या स्थानावर राहिला.

‘नीरज चोप्रा क्लासिक 2025’ स्पर्धेचे महत्त्व

‘नीरज चोप्रा क्लासिक 2025’ ही भारतातील पहिली वर्ल्ड ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर गोल्ड लेव्हल स्पर्धा ठरली. सात आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह 12 स्पर्धकांनी यात भाग घेतला. नीरजने स्वतःच्या नावाने आयोजित या स्पर्धेत विजय मिळवत भारतीय ऍथलेटिक्सचा मान वाढवला.

ही स्पर्धा 2025 हंगामातील त्याची सहावी स्पर्धा होती. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेतील पॉच आमंत्रण, पॅरिस डायमंड लीग आणि ऑस्ट्रोव्हा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजय मिळवला होता, तर दोहा डायमंड लीगमध्ये 90.23 मीटरचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत दुसरे स्थान पटकावले होते.