Sanjay Gaikwad statement on Thackeray | महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या शासकीय निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर, राज्य सरकारने हा निर्णय रद्द केला होता. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधुंनी मुंबईत संयुक्त विजयी मेळावा घेतला.
तब्बल 19-20 वर्षांनी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या मेळाव्याचा प्रचार ‘ठाकरे ब्रँड’ नावाने करण्यात आला. याशिवाय, शिवसेनेच्या सोशल मीडिया हँडलवर उद्धव, राज, आदित्य आणि अमित ठाकरे यांचा एकत्रित फोटो ‘ठाकरे ब्रँड’ या कॅप्शनसह शेअर केला.
मात्र, त्यानंतर आता शिवसेनेकडून (शिंदे गट) ठाकरे ब्रँडवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी ‘ठाकरे ब्रँड’वर टीका केली आहे. जर ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असतानाच शिवसेनेचे 288 आमदार निवडून आले असते, असे वक्तव्य त्यांनी केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठाकरे ब्रँड! pic.twitter.com/XKgBCo6Obg
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 5, 2025
संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लातूरमध्ये मेळाव्यावर आणि ‘ठाकरे ब्रँड’वर टीका केली. ते म्हणाले, “15 वर्षांपूर्वी एकत्र आले असते, तर काही परिणाम दिसला असता. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, आणि राज ठाकरे यांनीही उशीर केला आहे. ठाकरे ब्रँड आता राहिलेला नाही. बाळासाहेब हयात असताना 288 आमदार निवडून आले नाहीत, तेव्हा 70-74 च्या पुढे गेले नाहीत.” गायकवाड यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गायकवाड यांनी हिंदी-मराठी वादावरही भाष्य केले. “मराठीचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे. पण जगात टिकायचे असेल, तर सर्व भाषा अवगत असाव्या लागतात. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ बहुभाषिक होते. दहशतवाद रोखायचा असेल, तर उर्दूसारख्या भाषाही शिकाव्या लागतील,” असे ते म्हणाले.