नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नीट- यूजी (NEET- UG) परीक्षेच्या अंतिम उत्तरसूचीला आणि निकालाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला.
न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत देश पातळीवर घेतलेल्या परीक्षेत हस्तक्षेप केल्याने अनेक विद्यार्थ्यांना (students) त्याचा फटका बसू शकतो.
याचिकाकर्ते शिवम गांधी रैना यांच्यातर्फे वरिष्ठ वकील आर. बालसुब्रमण्यम यांनी एनईआरटीकडून एका प्रश्नाच्या उत्तरात चूक झाली आहे, त्यामुळे अधिकृत मजकुरानुसार उत्तरपत्रिकेत असलेल्या कथित त्रुटी दूर कराव्यात आणि त्यानुसार निकाल देण्याचे निर्देश एनसीईआरटीला द्यावेत अशी मागणी केली होती. यावर न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, आम्ही बुधवारी अशीच एक याचिका फेटाळून लावली होती. आम्ही परीक्षेबाबत हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही कदाचित तत्त्वतः बरोबरही असाल. अनेक बरोबर उत्तरे असू शकतात. तरीही, सध्याच्या घडीला देश पातळीवर घेतलेल्या परीक्षेत हस्तक्षेप केल्याने अनेक विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होईल, त्यामुळे देश पातळीवर घेतलेल्या परीक्षेत वैयक्तिक प्रकरणावरुन हस्तक्षेप करू शकत नाही.