ठाकरे बंधू एकत्र येताच सत्ताधाऱ्यांची रडारड सुरू; खा. संजय राऊतांची टीका

sanjay raut

मुंबई- ठाकरे बंधू (Thackeray brothers) एकत्र आले आणि लगेच सत्ताधाऱ्यांची रुदाली सुरू झाली. आता फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिंदे (Eknath Shinde) यांनी रडण्याचे कार्यक्रम ठेवावेत असा उपरोधिक टोला उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लगावला. विजय मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली. यावरुन खासदार राऊत यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

संजय राऊत म्हणाले की, जनतेला कोण खरे आणि कोण खोटारडे आहेत हे चांगलेच माहीत आहे. त्यामुळेच लाखोंच्या संख्येने जनसमुदाय मेळाव्यात सहभागी झाला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंधळले आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून आता जाहीरपणे रडण्याची मालिका सुरू झाली आहे. राज्यभर फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रडण्याचे कार्यक्रम आयोजित करावेत. ठाकरे कुटुंबाने लेखणी आणि वाणीच्या बळावर महाराष्ट्रावर आपले अधिराज्य निर्माण केले आहे. यात कोणताही दिखावा नाही. ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून सत्ताधाऱ्यांचे संतुलन ढासळले असून, त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिशाभूल स्पष्टपणे दिसून येते. हीच त्यांची बुद्धी भ्रमित झाल्याची खूण आहे.