Sara Arjun | अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) 40 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटाचा (Dhurandhar Movie) फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय थ्रिलरमध्ये रणवीरसह संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र, सर्वांचे लक्ष अभिनेत्री सारा अर्जुन (Sara Arjun) वेधून घेतले आहे. सारा अर्जुन या चित्रपटात रणवीरसोबत झळकणार आहे.
सारा अर्जुन कोण आहे?
2005 मध्ये जन्मलेली सारा अर्जुन ही अभिनेता राज अर्जुन यांची मुलगी आहे. वयाच्या पहिल्या वर्षीच एका जाहिरातीतून तिची कारकीर्द सुरू झाली. 2011 मधील तमिळ चित्रपट ‘दैवा तिरुमगल’मधील विक्रमच्या मुलीच्या भूमिकेने ती प्रकाशझोतात आली होती.
आतापर्यंत ‘एक थी डायन’, ‘सैवं’ आणि ‘सांड की आँख’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने बालकलाकार म्हणून नाव कमावले आहे. 2022 मध्ये मणि रत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन’मध्ये युवा नंदिनीच्या भूमिकेने ती भारतातील सर्वात श्रीमंत बालकलाकार ठरली. ‘पोन्नियिन सेल्वन’मुळे सारा अर्जुन चर्चेत आली होती. आता रणवीर सिंगसोबत ‘धुरंधर’ चित्रपटात झळकणार आहे.
‘धुरंधर’मधील साराची भूमिका
‘धुरंधर’मधील साराची भूमिका छोटी असली तरी महत्त्वपूर्ण असणार आहे. फर्स्ट लुकमध्ये ती क्लबमध्ये नाचताना, रणवीरसोबत गाडीवर आणि डान्स करताना दिसते.
दरम्यान, ‘धुरंधर’चा फर्स्ट लुक रणवीरच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित झाला आहे. ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला रिलीज होणार आहे.