बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh murder case) प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मीक कराडचा (Valmik Karad) दोषमुक्तीचा व मालमत्ता जप्तीच्या अर्जावर २२ जुलैला निर्णय होणार आहे. याप्रकरणी आज बीडमधील विशेष मकोका न्यायालयात (Makoka Court) सुनावणी झाली. यावेळी वाल्मीक कराड याच्यासह इतर आरोपींच्या मालमत्ता जप्तीबाबतच्या अर्जावर युक्तिवाद झाला.
आरोपीचे वकील विकास खाडे म्हणाले की,वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्यासाठीचा अर्ज यापूर्वी दाखल केला होता. त्यावर युक्तिवाद झाला. त्याचे बँक खाते आणि मालमत्तेवर लावलेले सील काढण्याची मागणी न्यायालयात केली.कारण संबंधित बँक खाते आणि मालमत्ता ही कोणत्याही गुन्ह्यातून मिळवलेली नाही. या गुन्ह्याचा व त्या मालमत्तेचा काहीही संबंध नाही.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडला नाशिकच्या तुरुंगात हलवणार का? याबाबत सांगितले की,वाल्मीक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे. या प्रकरणी न्यायालयात कोणताही अर्ज दाखल नाही. वाल्मीक सध्या बीड जिल्हा कारागृहातच आहे. त्याला कोणत्या तुरुंगात ठेवणे अधिक सुरक्षित राहील याबाबत मला माहिती नाही.