Home / महाराष्ट्र / विजयी मेळाव्यानंतर मराठीसाठीचा मोर्चाही गाजला! मराठी माणसाने पुन्हा सरकार, पोलिसांना झुकवले

विजयी मेळाव्यानंतर मराठीसाठीचा मोर्चाही गाजला! मराठी माणसाने पुन्हा सरकार, पोलिसांना झुकवले

मुंबई- मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यानंतर आज त्याच विषयी मिरा-भाईंदर येथे मनसे व मराठी एकीकरण समितीने काढलेला प्रचंड मोर्चाही गाजला. आज...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यानंतर आज त्याच विषयी मिरा-भाईंदर येथे मनसे व मराठी एकीकरण समितीने काढलेला प्रचंड मोर्चाही गाजला. आज मराठी माणसाने पुन्हा सरकार आणि पोलिसांना झुकवले आणि अखेर हा मोर्चा यशस्वी केला.
राज्यातील मराठी विरुद्ध अमराठी भाषावाद पुन्हा एकदा चिघळलेला असतानाच मराठी बोलणार नाही असे म्हणणाऱ्या मीरा रोड परिसरातील व्यापाऱ्याच्या दुकानासमोरच मनसेने भव्य मोर्चा काढला. मनसेच्या नेतृत्वात मराठी भाषिकांनी आज सरकार आणि प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली. अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी मोर्चा काढून आपली मराठी अस्मिता दाखवून दिली. या आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की मराठी माणूस अन्याय सहन करत नाही आणि गरज पडल्यास सरकार व प्रशासनालाही झुकवण्याची ताकद ठेवतो. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने या परिसरामध्ये कलम 144 लागू केले होते.
भाषिक वादाची सुरुवात मीरा रोड येथे एका व्यापाऱ्याने केली. त्याने मराठीत संवाद साधण्यास नकार दिला. यावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी त्या व्यापाऱ्याला थोबाडीत मारली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि वादाचे स्वरूप वाढले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठी-अमराठी मुद्यावरून तणाव निर्माण झाला. या मारहाणीचा निषेध करत स्थानिक अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. याचवेळी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले. ज्यामुळे वातावरण अजूनच चिघळले. या पार्श्वभूमीवर मनसेने अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली. या मोर्चाला केवळ मनसे नव्हे, तर मराठी एकीकरण समिती, उबाठा आणि अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. पक्षभेद बाजूला ठेवत सर्वांनी मराठीसाठी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला. मोर्चात भाजपा शहर सचिव सोमनाथ पवारही सहभागी झाले.
हा मोर्चा ओम शांती चौक ते मीरा रोड रेल्वे स्थानक या मार्गावर नियोजित होता. हा मार्ग संवेदनशील असल्याचे सांगत पोलिसांनी या मार्गावर मोर्चाला परवानगी नाकारली. दूर घोडबंदर रोड येथून मोर्चा काढा असे पोलीस सांगत होते, पण मनसेला ते मान्य नव्हते. मनसे मोर्चा काढणार म्हटल्यावर पोलिसांनी पहाटेपासून धरपकड सुरू केली. मनसे नेते अविनाश जाधव यांना पहाटे 3 वाजता ताब्यात घेऊन पालघर पोलीस ठाण्यात नेले. सकाळी आंदोलक मोर्चासाठी मोठ्या संख्येने गोळा होऊ लागताच पोलिसांनी त्यांना अटक करण्यास सुरुवात केली. महिला कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात अटक केले जाऊ लागले. यामुळे संतापाची लाट उसळली. पोलिसांनी व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्यास परवानगी दिली नव्हती तरीही त्यांचा मोर्चा निघाला. आम्हाला मात्र अटक केले जात आहे अशी तक्रार करीत आंदोलकांना महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यास सुरुवात केली. मराठी माणसांवर अन्याय होत आहे असे त्यांचे म्हणणे होते. यातून परिस्थिती पोलीस प्रशासनाच्या हाताबाहेर गेली. मनसे कार्यकर्त्यांना तात्पुरते ताब्यात घेऊन एका सभागृहात ठेवले. मात्र ते सुरक्षा भेदून मोर्चात सहभागी झाले. इकडे पालक मंत्री शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी पोलीस कारवाईचा निषेध केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मोर्चा दुसऱ्या रस्त्याने काढला तर परवानगी देऊ. पण अखेर आंदोलकांची ताकद पाहून सरकार व पोलीस प्रशासन झुकले आणि त्यांनी दुपारी 12 वाजता मोर्चाला परवानगी दिली. त्यानंतर मोर्चा शांततेत आणि नियोजित मार्गावरच पार पडला. तोपर्यंत मुंबईहून संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई पोहोचले. अविनाश जाधव यांना पालघर पोलीस ठाण्यातून सोडले आणि तेही पोहोचले. एका टेम्पोत उभे राहून या सर्वांनी भाषणे केली आणि मोर्चा समाप्त झाला.
आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर अविनाश जाधव म्हणाले की, पोलिसांनी सोडल्यापासून सर्व मोर्चेकरांना भेटण्यासाठी माझा जीव कासावीस झाला होता. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या आंदोलनाला यश आले आहे. पोलिसांनी कितीही दडपशाही केली, तरी एवढ्या मोठ्या संख्येने मराठी माणूस रस्त्यावर उतरला. जर कोणालाच अटक केली नसती आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तर किमान 50 हजार लोकांचा हा मोर्चा झाला असता. मराठी माणसासाठी आपण अशीच एकजूट दाखवूया.आज एकाने मोर्चा काढला, उद्या दुसऱ्याने मोर्चा काढला असता. इथला आमदार नेहमी सांगतो की, मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणूस 12-15 टक्के आहे. मात्र जेवढे आहेत, तेवढे पुरुन उरण्यासाखे आहेत. यापुढे आमच्या नादाला लागायचे नाही. मराठी माणूस कोणाचे ऐकणार नाही.
उबाठा नेते राजन विचारे म्हणाले की, प्रताप सरनाईक यांना या ठिकाणावरून हाकलून दिले. मात्र त्यांना जोड्याने मारायला हवे होते. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावे.हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये वाद लावून देण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. या भूमीमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व जातीधर्मातील लोकांनी एकत्रित हा मोर्चा काढला.
या घटनेवरून राजकीय वातावरण तापले. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी अधिवेशन परिसरात बोलताना मनसेच्या आंदोलनावर टीका केली. ते म्हणाले की, परप्रांतीय व्यापाऱ्यांचा मोर्चा स्पष्ट हेतूसाठी होता. मात्र मनसेचा मोर्चा संशयास्पद होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. परप्रांतीयांच्या मोर्चालाही परवानगी नव्हती. परंतु त्यांचा हेतू एकच आणि स्पष्ट होता. आमच्या लोकांना मारले, असे भविष्यात घडू नये आणि त्यावर कडक कारवाई व्हावी एवढीच त्यांची भूमिका होती. ते लोक एका सभागृहात संघटित झाले होते. त्यांनी कोणतेही असभ्य वर्तन केले नाही. मात्र मराठी एकीकरण समिती व मनसेची दाखवायचे एक आणि करायचे दुसरे अशी भूमिका असल्याची शक्यता आहे. लोकशाहीत मोर्चा कोणीही काढू शकतो. यावर मराठी आंदोलकांनी सवाल उपस्थित केले की, मराठी लोकांचा मोर्चा म्हणजे धोक्याचा वाटतो, पण परप्रांतीयांचा वाटत नाही का?
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, दोन्ही मोर्चांना परवानगी दिली नव्हती. व्यापारी मोर्चा काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. समाज माध्यमांवर परप्रांतीय मोर्चाला परवानगी असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मोर्चा काढताना मार्ग व वेळ पोलीस प्रशासनाशी सुसंगत ठरवणे बंधनकारक असते. 6 दिवसांपूर्वीच याठिकाणी घटना घडली होती. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला जे योग्य वाटते ते राखण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सांगितले की, आंदोलक मुद्दाम संवेदनशील मार्गाची मागणी करत होते. ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले की, आंदोलनाच्या आधी अटक करणे योग्य नव्हते आणि सरकारकडून पोलिसांना कोणताही आदेश दिलेला नव्हता. मात्र पोलिसांनी जर मराठी मोर्चालाही परवानगी दिली नव्हती तर शांततेत मोर्चा काढू द्यायला पाहिजे होता. सरकारने पोलिसांना आदेश दिले नव्हते. पोलिसांनी ही कारवाई कोणाला तरी मोठे करण्यास केले असेल. मी मंत्रिपद आणि आमदारपद बाजूला ठेवून मोर्चात सहभागी होत मोर्चात सहभागी होणार आहे.
मोर्चापूर्वी व्यापाऱ्यांचे माफीपत्र
मीरा-भाईंदरमध्ये 3 जुलै रोजी व्यापाऱ्यांनी मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. या व्यापाऱ्यांनी मनसेचा मोर्चा निघण्यापूर्वी माघार घेत माफीपत्र पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना दिले. या पत्रावर अनेक व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यांनी पत्रात म्हटले की, व्यापारी मोर्चा कोणत्याही समाज, पक्ष किंवा भाषेविरोधात नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही माफीनामा सादर करतो. मारहाणीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीती पसरली होती. ती भीती दूर करण्यासाठी मोर्चा आयोजित केला होता.
जयंत पाटलांना संशय
शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी हा संपूर्ण प्रकार जाणीवपूर्वक घडवण्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, जाणूनबुजून मराठी आणि अमराठी असे दोन भाग करण्याचे हे षड्यंत्र आहे. हे सर्व आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केले जात आहे.
मंत्री सरनाईकांना मोर्चा सोडावा लागला
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या भूमिकेचा निषेध करून मीरा रोड येथे आंदोलनस्थळी पोहोचले. परंतु ते आल्यानंतर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. एकाने त्यांच्यावर बाटली फेकली. त्यांच्या विरोधात 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी झाली. सरनाईक ‌‘गो बॅक‌’च्या घोषणा झाल्या. यामुळे तणाव निर्माण झाला. प्रसंग ओळखून त्यांनी मोर्चा सोडला आणि पोलीस बंदोबस्तात आपली गाडी गाठून ते निघून गेले. यावेळी ते म्हणाले की, उबाठा आणि मनसेचे राजकारण सुरूच राहणार आहे. पण मीरा-भाईंदरच्या मराठी माणसासाठी प्रताप सरनाईक कायम हजर आहे. पोलिसांनी कोणाला अटक केली असेल तर ते सहन केले जाणार नाही. मी प्रांजळपणे या शहराचा आमदार आणि मंत्री म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी काही बाहेरचे लोक होते. त्यांनी ठरवले होते ते त्यांनी केले. मीरा-भाईंदर शहरातील वातावरण शांत करण्यासाठी मी त्या ठिकाणी जाणे माझे कर्तव्य होते. पोलिसांनी आधीच मला तुमच्या विरोधात घोषणाबाजी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. मात्र, मी मराठी एकीकरण समितीसाठी त्या ठिकाणी गेले होते. उद्धव ठाकरे गटाचे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी ज्यांना पोलिसांनी अटक केली होती त्यांना सोडवून मी त्या ठिकाणी गेलो होतो. लोकप्रतिनिधी म्हणून तिथे जाणे माझे कर्तव्य होते. अभिजित पानसे यांच्याशी मी चर्चा केली होती. श्रेयवादासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, त्यांनी ते केले. त्याला मला मोठे करायचे नाही. मात्र निश्चितपणे आज मराठी माणसाने एकत्र यावे अशी परिस्थिती होती. त्यासाठी मी शब्द दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी पोहोचलो होतो.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी सरनाईक यांच्यावर बाटली फेकल्याच्या घटनेचा निषेध करून त्यांचे आंदोलनस्थळी आल्याबद्दल आभार मानले. जाधव म्हणाले की, मंत्री सरनाईक यांच्याबद्दल जे झाले ते योग्य नाही. ज्यावेळी ते मोर्चात सहभागी झाले त्यावेळी ते मराठी माणूस म्हणून आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे वक्तव्य मला आवडले नाही. मात्र आज सकाळपासून ते मराठी माणसाला मोर्चा काढू का दिला नाही? यावर सातत्याने बोलत होते. त्यामुळे जर एखादी मराठी माणूस मराठीसाठी मोर्चात येत असेल तर त्याला प्रेमाने सोबत घेतले पाहिजे. मनसेने त्यांचे स्वागत केले तरी इथे आल्यावर मी आपोआप हिंदी बोलतो या त्यांच्या काही दिवसांपूर्वीच्या वाक्याबद्दल मोर्चात संताप व्यक्त होत होता.
तुलाही अटक करू!
चिमुकल्याला खडसावले

ओंकार करचे नावाचा चिमुकला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून घोड्यावरून आजच्या मोर्चात सहभागी झाला होता. मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना अटक करण्यास सुरुवात केली, त्यावेळी पोलिसांनी छोट्या ओंकारलाही घोड्यासह बाजूला नेले आणि त्याला तुलाही अटक करू, असे खडसावले. याबाबत ओंकार म्हणाला की, महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे. मराठी येत नसल्यामुळेच हा मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी मला तू इथून निघून जा, नाहीतर तुझ्यासह घोड्यालाही अटक करू असे सांगितले.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या