शिक्षकांच्या आंदोलनाचा अखेर विजय! शरद पवार-ठाकरेंची प्रथमच उपस्थिती

मुंबई- राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांचे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे नेते भेट देत आहेत. या आंदोलनाला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपस्थिती दर्शवली. या शिक्षकांच्या अनेक वर्षे सुरू असलेल्या आंदोलनाला ते प्रथमच उपस्थित राहिले. त्यानंतर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणस्थळी जाऊन घोषणा केली की, शिक्षकांचा वाढीव टप्प्याचा पगार 18 जुलैला त्यांच्या खात्यात जमा होईल.
गिरिश महाजन म्हणाले की, शिक्षकांचा संताप स्वाभाविक आहे. मी काल रात्री या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेतली. त्यांना सांगितले की, आमची भूमिका सकारात्मक आहे. आतापर्यंत तुम्हाला दुसरे कोणी विचारले होते का? जे कोणी कालपासून रडताहेत, त्याचेही सरकार होते, तेव्हा त्यांनी तुम्हाला दालनात प्रवेशही दिला नाही. असे चालणार नाही. सगळे धाडसी निर्णय आम्ही घेतले. यावेळी आर्थिक कारणांमुळे उशीर झाला. पण आता वेळ घालवण्यात अर्थ नाही. म्हणूनच फडणवीस साहेबांनी आज वित्त विभागाबरोबर बैठक घेतली. तुमचे काम आम्हीच करणार. काही तांत्रिक बाबी आहेत. पुरवणी मागण्यांतून पैसे घेतलेले नाहीत. दुसऱ्या कुठल्या खात्यातून पैसे घ्यावे लागतील. म्हणूनच या तांत्रिक गोष्टी समजून अधिवेशन संपताच 18 तारखेला तुमच्या खात्यात 20 टक्के वाढीव टप्प्याचा पगार जमा झालेला असेल. हे एका महिन्यासाठी नाही, तर पुढेही पगाराची वाट पाहावी लागणार नाही.
मुंबईत कालपासून सुरू झालेल्या या आंदोलनात 25,000 हून अधिक विनाअनुदानित शिक्षक सहभागी झाले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कालपासून आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनस्थळी मुक्कामच ठोकला होता. शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत तेथेच थांबण्याचा निर्धार व्यक्त केला होता. खासदार खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, खा. नीलेश लंके, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही येथे येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची आंदोलनकर्त्या शिक्षकांशी भेट होण्याआधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. यावेळी शरद पवार म्हणाले की, मागील काही दिवसांपासून शिक्षक आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. राज्य प्रशासनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या शिक्षकांचा सन्मान राखणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आमदार रोहित पवारांकडून समजले की, येथे एक मंत्री आले होते. त्यामुळे वाटले की प्रश्न मार्गी लागेल. पण अजूनही प्रश्न सुटलेला नाही. 1980-81 मध्ये शिक्षकांनी असेच आंदोलन केले होते. तेव्हा केंद्र सरकार जे देते, ते राज्याने द्यावे अशी मागणी होती. ती नाकारली. त्यानंतर मी ती जबाबदारी घेतली आणि शिक्षकांची मागणी मान्य केली. आता त्याच महाराष्ट्रात शिक्षकांना अनुदानासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे दुर्दैवी आहे.
शिक्षकांच्या मागणीसाठी लवकरात लवकर निधीची तरतूद करा. त्यांच्यासाठी आम्ही सर्वजण आग्रही भूमिका घेणार आहोत. निर्णय झाल्यानंतर जीआर काढायला अर्थखात्याकडे जावे लागते. सामान्य प्रशासन खात्याकडे जावे लागते. महाराष्ट्राची विधानसभा, विधान परिषद आणि देशाची लोकसभा, राज्यसभा यात मी 56 वर्षे सतत कार्यरत आहे. त्यामुळे कसा निर्णय घ्यायचा असतो, कशी तरतूद आणायची असते आणि ती कशी तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते, हे मला कोणी सांगायची गरज नाही. तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारशी संवाद साधू आणि प्रश्न सोडवू.
उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, आपली संस्कृती ही ‌‘गुरू देवो भव‌’ अशी आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि गुरू देवो भव ही आपली मूल्ये आहेत. आजचे सत्ताधारी हे विसरले आहेत. त्यांना गुरू म्हणजे काय हेच समजत नाही. त्यांच्या गुरूंच्या आज्ञा दिल्लीहून येतात आणि त्या अंमलात आणताना आपल्या गुरूंवर म्हणजे शिक्षकांवर अन्याय केला जातो. ही गोष्ट अत्यंत लज्जास्पद आहे. शासनाने ऑक्टोबर 2024 मध्ये अधिवेशनात निर्णय घेतला होता. राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासाठी सातत्याने आंदोलन करूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. शिक्षकांना चिखलात बसून आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा लागत आहे. हाच या सरकारचा खरा चेहरा आहे. ठाकरे गट तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील. तुमचे हक्काचे अनुदान मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणावेळी अचानक माईक बंद झाला. त्यानंतर तुम्ही आमचा माईक बंद करू शकता, पण आमचा आवाज थांबवू शकत नाही. हा आवाज लोकशाहीचा आहे. आवाज बंद करण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.
अनेक वर्षांनी शरद पवार मैदानात
25 जानेवारी 2021 रोजी शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी शरद पवार आझाद मैदानात आले होते. त्यानंतर मागील तीन वर्षे शरद पवार कधीच आझाद मैदानात आले नाही. त्यामुळे ते आज आंदोलकांसमोर आले याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. शिक्षकांचे आंदोलनही गेली अनेक वर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार होते, तेव्हाही हेच आंदोलन सुरू होते. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मविआ सरकार काळातही याच मागण्यांसाठी आंदोलने झाली होती. त्या काळात शरद पवार कधीही शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी जाहीरपणे पुढे आले नाहीत.