Arvind Kejriwal: ‘मला नोबेल पारितोषिक मिळायला हवे’, केजरीवाल यांचे वक्तव्य, भाजपने उडवली खिल्ली

Arvind Kejriwal Nobel Claim

Arvind Kejriwal Nobel Claim | दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील प्रभावी प्रशासनासाठी नोबेल पारितोषिक (Nobel Prize) मिळायला हवे, असे वक्तव्य केले आहे. केजरीवाल यांनी स्वतःच नोबेल पुरस्कार मिळायला हवे, असे वक्तव्य केल्याने आता याची चर्चा सुरू झाली आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) तीव्र आक्षेप घेत केजरीवाल यांचे विधान “हास्यास्पद” असल्याचे म्हटले आहे. भाजपने (BJP) त्यांच्या कार्यकाळात अक्षमता आणि भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला आहे.

केजरीवाल यांचा दावा आणि भाजपचा पलटवार

‘द केजरीवाल मॉडेल’ या पुस्तकाच्या पंजाबी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बोलताना केजरीवाल म्हणाले, “नायब राज्यपाल आणि अनेक अडथळ्यांनंतरही आमच्या सरकारने दिल्लीत प्रभावी प्रशासन दिले. इतके काम केल्याबद्दल मला प्रशासनासाठी नोबेल पारितोषिक मिळायला हवे.” या विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी दिल्लीतील भाजप सरकारवरही टीका केली. सप्टेंबर 2024 मध्ये ‘आप’ सत्तेतून बाहेर पडल्यानंतर दिल्लीतील सेवा कोसळल्याचा दावा त्यांनी केला. “भाजपचे आमदार आणि मंत्री प्रशासनापेक्षा लूटमार करण्यात व्यस्त आहेत. लोकांना ‘आप’ची राजवट आधीच मिस होत आहे,” असे ते म्हणाले.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी यावर जोरदार टीका केली आहे. “केजरीवाल यांचा नोबेलचा दावा हास्यास्पद आहे. जर अक्षमता आणि भ्रष्टाचारासाठी नोबेल दिले गेले, तर ते त्यांना नक्कीच मिळाले असते,” असे सचदेवा म्हणाले.

त्यांनी ‘आप’ सरकारच्या कथित अनियमिततांची यादीच वाचून दाखवली. त्यांनी पॅनिक बटण घोटाळा, वर्गखोल्यांचे बांधकाम, महिलांसाठीच्या पेन्शन योजना, दारू परवाना आणि ‘शीशमहल’ नूतनीकरण यांचा उल्लेख करत केजरीवल यांच्यावर निशाणा साधला.