Video: ‘रील’च्या नादात जीव धोक्यात! साताऱ्यात कार 300 फूट खोल दरीत कोसळली, तरुण गंभीर जखमी

Satara Accident Viral Video

Satara Accident Viral Video | साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील सडावाघापूरच्या प्रसिद्ध उलट्या धबधब्याजवळ एक भयानक अपघात घडला. रील बनवण्याच्या नादात 20 वर्षीय तरूणाची गाडी दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

या तरूणाचे साहिल जाधव असे सांगितले जात आहे. स्टंट करत असताना तरूणाची कार थेट 300 फूट खोल दरीत कोसळली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याचे मित्र फोटो काढण्यासाठी खाली उतरल्याने वाचले, पण या घटनेने पावसाळी पर्यटनस्थळांवरील निष्काळजीपणा आणि सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

नेमकं काय घडलं?

कराडच्या गोळेश्वरमधील साहिल जाधव आपल्या चार मित्रांसोबत उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेला होता. पावसाळ्यात हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. गुजरवाडीतील टेबल पॉईंटवर साहिलने रीलसाठी स्टंट करण्याचा प्रयत्न केला.

गवतावर चाक घसरल्याने कारचा ताबा सुटला आणि ती 100 फुटांहून अधिक खोल दरीत झाडांमध्ये अडकली.

अपघाताची माहिती मिळताच पाटण पोलिसांनी साहिलला दरीतून बाहेर काढले. तो रक्तबंबाळ झाला असून, त्याच्यावर कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.