मुंबई- मुलाच्या हॉटेल खरेदीचे प्रकरण, त्यानंतर कालच आयकर खात्याची नोटीस मिळाल्याचे वृत्त यामुळे सतत वादात सापडणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली. या व्हिडिओत शिरसाट आपल्या बेडरूममध्ये पलंगावर बनियान घालून बसलेले दिसतात. त्यांच्या शेजारी असलेल्या मोठ्या प्रवासी बॅगेत नोटांची असंख्य बंडले दिसत आहेत. या व्हिडिओने खळबळ माजली असून, शिरसाट यांना या विषयावर ठोस उत्तर देता न आल्याने त्यांची चौकशी होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुलाच्या हॉटेल खरेदीचे प्रकरण, त्यानंतर कालच आयकर खात्याची नोटीस मिळाल्याचे वृत्त यामुळे सतत वादात सापडणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली. या व्हिडिओत शिरसाट आपल्या बेडरूममध्ये पलंगावर बनियान घालून बसलेले दिसतात. त्यांच्या शेजारी असलेल्या मोठ्या प्रवासी बॅगेत नोटांची असंख्य बंडले दिसत आहेत. या व्हिडिओने खळबळ माजली असून, शिरसाट यांना या विषयावर ठोस उत्तर देता न आल्याने त्यांची चौकशी होणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.संजय राऊत हा व्हिडिओ पोस्ट करून म्हणाले की, शिरसाटांना आयकर खात्याची नोटीस आलेली आहे. त्यांचा एक व्हिडिओ मला कुणीतरी पाठवला आहे. त्यामध्ये ते पैशांनी भरलेली बॅग घेऊन बसलेले दिसतात. हे पुरावे सर्वत्र जात असतात. सरकारमध्ये असल्याने आपल्याला कुणी हात लावत नाही, हा एक भ्रम असतो. तो काही काळ टिकतो. पण कारवाई होतेच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते! स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहत बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस! हाच व्हिडिओ हिंदीमध्येही पोस्ट करत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे.
राऊत यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर तो काही क्षणातच समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विधान भवनात शिरसाट यांच्याकडे त्याबद्दल विचारणा केली असता तो व्हिडिओ आपल्या घरातीलच असल्याची कबुली शिरसाट यांनी दिली. मात्र व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या उघड्या बॅगेत पैसे नसून कपडे होते, अशी त्यांनी अजब सारवासारव केली. आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले की, राऊत मुर्खासारखे काहीही बोलतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना हातपाय बांधून वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली आहे. मागे विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरले तेव्हा त्यांच्या अंगरक्षकांकडे नोटांनी भरलेल्या बॅगा होत्या, असा आरोप राऊत यांनी केला होता. अशा पागल माणसाच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. राऊत यांनी माझा जो व्हिडिओ समाज माध्यमांवर जारी केला त्यात स्पष्ट दिसत आहे की, मी कुठून तरी प्रवास करून संभाजीनगरला घरी आलो आहे. मी बनियान घालून बिछान्यावर निवांत बसलो आहे. माझ्या बाजूला उघडी बॅग आहे. त्यात कपडे आहेत. बॅगेत जर पैसे असते तर ते ठेवायला माझ्या घरात कपाटे नाहीत का? पैसे कोणी असे उघड्यावर टाकतात का? आता राऊतांचा व्हिडिओ काढण्याची वेळ आली आहे. त्यावर पत्रकारांनी त्यांना विचारले की, त्यांच्या घरातील, त्यांच्या बेडरूममधील असा व्हिडिओ काढणारा झारीतील शुक्राचार्य कोण असेल? त्यावर आणखी सारवासारव करीत ते म्हणाले की, मी नेत्यासारखा वावरत नाही. मी सामान्य कार्यकर्त्यासारखा वागतो. आमच्या घरात कुणीही कार्यकर्ता येतो जातो, कुणीतरी काढला असेल व्हिडिओ, त्याबद्दल मला काही वाटत नाही.
संजय शिरसाट असेही म्हणाले की, राऊतांचे एकंदरीत टार्गेट एकनाथ शिंदे असतात. शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी जी काही भूमिका मांडली होती त्यामुळे त्यांची गेलेली सत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आम्हाला सत्तेतून या माणसाने बाहेर खेचले. माझी खुर्ची घेतली, 50 खोके, या सगळ्या वल्गना करून झाल्यावर आता ही नवीन स्टोरी बनवली आहे. संजय राऊत यांना हातपाय बांधून हॉस्पिटलमध्ये न्यावे की काय, अशी परिस्थिती आहे.
व्हिडिओची चौकशी करा
आदित्य ठाकरेंची मागणी
संजय शिरसाट यांच्या या व्हिडिओवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शिरसाट यांच्यावर सडकून टीका केली. पन्नास खोके, एकदम ओके, शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या पन्नास खोक्यांपैकी एक खोका आज दिसला, असा खोचक टोला लगावत या व्हिडिओची सखोल चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
