महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण! ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा, शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश

Maratha Forts in UNESCO List

Maratha Forts in UNESCO List | महाराष्ट्रासह भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. मराठा शासकांनी विकसित केलेल्या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला असून, यात महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील 1 किल्ल्याचा समावेश आहे.

पॅरिसमधील 47व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात 11 जुलै 2025 रोजी हा निर्णय जाहीर झाला. यामुळे भारताचे एकूण 44 जागतिक वारसा स्थळे झाली असून, मराठ्यांच्या लष्करी आणि सांस्कृतिक वारशाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे.

कोणत्या किल्ल्यांचा समावेश?

या यादीत महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील 1 असे एकूण 12 किल्ले समाविष्ट आहेत. यामध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खंडेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) आणि जिंजी (तमिळनाडू) हे किल्ले येतात. हे किल्ले 17व्या ते 19व्या शतकातील मराठा सामरिक शक्तीचे प्रतीक आहेत.

पुरातत्व सर्वेक्षणाने सांगितले की, हे किल्ले लष्करी अभियांत्रिकी, भौगोलिक अनुकूलता आणि स्वदेशी बांधकाम तंत्रांचे उत्तम उदाहरण आहेत. युनेस्कोच्या या निर्णयाने भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक व्यासपीठ मिळाले आहे.

जागतिक वारसा समितीचा निर्णय

6 ते 16 जुलै 2025 या कालावधीत पॅरिस येथे सुरू असलेल्या 47व्या अधिवेशनात 21 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी हा निर्णय घेतला. युनेस्कोच्या सल्लागार संस्था आणि सचिवालयाच्या विश्लेषणावर आधारित हा समावेश झाला, जो भारताच्या वारसा संवर्धनाला बळ देणारा आहे.