बारामती – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणामुळे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रोहित पवार आणि इतरांविरुद्ध न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
यावर रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली की, कुणाचे आणि काय ऐकले नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे. याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचे पालन केले आणि आता आरोपपत्रही दाखल केले. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या न्यायालयात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच. विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे. महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतले, हा इतिहास आहे.
काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या ५० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर आता त्यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या आरोपांनुसार, सहकारी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारात बारामती अॅग्रोचा थेट सहभाग असल्याचा संशय असून, रोहित पवार यांच्यावर गैरव्यवहारातून आर्थिक लाभ घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी यापूर्वी या चौकशीविषयी सहकार्याची भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते आणि सर्व आरोप फेटाळले होते. मात्र ईडीच्या या नव्या आरोपपत्रामुळे या प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.