बेळगावात कन्नडची सक्ती, मराठी फक्त घरातच बोला!

बेळगाव – कर्नाटकात भाजपची सत्ता असलेल्या बेळगाव महापालिकेतून मराठी भाषाच हद्दपार करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला आहे. महापौर, उपमहापौरांच्या वाहनांवरील नामफलक कन्नडमध्ये केले होते. त्यानंतर आता सर्व कागदपत्रे, व्यवहाराची भाषा फक्त कन्नडच करण्याचा फतवा काढला आहे. ‘तुमची भाषा मराठी असेल तर घरातच बोला’ अशा सूचना कन्नड विकास प्राधिकरणाने कर्मचार्‍यांना दिल्या आहेत.

बेळगाव महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून मंगेश पवार हे महापौर आहेत. पालिकेत राजरोसपणे कानडीकरण केले जात असताना अद्याप महापौर पवार आणि भाजपा नगरसेवकांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनीही आदेश काढला आहे. सरकारी कामकाज पूर्णपणे कन्नड भाषेत करण्यात यावे. अन्य भाषेतील व्यवहार बंद करावेत. फलक, आदेश केवळ कन्नड भाषेतून देण्यात यावेत, असा फतवा काढण्यात आला आहे. गुरुवारी कन्नड प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम बिळीमले यांनी जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयात बैठक घेतली. यावेळी बिळिमले, सचिव संतोष हंगल यांनी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कन्नड सक्तीची अंमलबजावणी करावी. जनतेलाही कन्नड भाषेतच सेवा पुरवल्या पाहिजेत, अशा सूचना केल्या.त्यानंतर सर्व नामफलक, कागदपत्रे कन्नड भाषेत करण्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू केली. अंगणवाडी स्तरापासून सर्व सरकारी कार्यालयांत व्यवहाराची भाषा कन्नड ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्राधिकरणाने कन्नडविरोधी लिखाण करणाऱ्या मराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळिमले यांनी सांगितले. कोणी कन्नड बोलत नसेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन कारवाई केली जाईल.