चंडीगड – हरियाणातील टेनिसपटू राधिका यादव हत्याप्रकरणात (Tennis player Radhika Yadav murder case) रोज नवे धक्कादायक तपशील बाहेर येत आहेत. आता पहिल्यांदाच राधिकाची जिवलग मैत्रीण हिमांशिका सिंग राजपूत हिने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंट एक व्हिडिओ पोस्ट करत राधिकावर तिच्या कुटुंबाचा मानसिक दबाव असल्याचा दावा केला आहे. राधिका निर्दोष होती. तिची घुसमट होत होती. तिच्यावर अनेक बंधने होती, असे हिमांशिकाने भावूक होत सांगितले.
व्हिडिओमध्ये राधिकाचे काही जुने फोटो आणि तिच्या आयुष्यातील काही हसरे क्षण दिसतात. हिमांशिका म्हणाली की, राधिका माझी ८-१० वर्षांची मैत्रीण होती. आम्ही दोघी २०१२-१३ पासून एकत्र टेनिस खेळत होतो. ती खूपच मेहनती होती आणि तितकीच दयाळू होती . पण शेवटच्या काळात ती खूपच शांत झाली होती. राधिकाच्या पालकांचा तिच्यावर प्रचंड दबाव होता. ती कोणाशी बोलत असेल, तर तिला आधी याची कल्पना द्यावी लागत असे. तिला फोटो काढायला आणि व्हिडिओ बनवायला आवडायचे, पण याला मनाई करण्यात आली होती. तिचे आई-वडील खूपच रूढीवादी होते. समाज काय म्हणेल, याचाच सतत विचार करायचे.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका म्युझिक व्हिडिओविषयी हिमांशिकाने खुलासा केला की, तो एक सामान्य म्युझिक व्हिडिओ होता. तिच्या स्वतःच्या वडिलांनी तिला शूटची परवानगी दिली होती. त्याशिवाय, तिने इतरही बरेच शूट केले होते. राधिकाची अकादमी तिच्या घरापासून फक्त ५० मीटरवर होती, पण घरात परतण्याची वेळ निश्चित होती. त्यात कोणतीही सवलत नव्हती. तिच्या वर्तवणुकीबाबत तिला सतत प्रश्न विचारले जायचे. .राधिका एक चांगली प्रशिक्षक होती आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होती. तिचा मृतदेह पाहिल्यानंतर मी स्वतःला रोखू शकले नाही आणि शेवटी ही माहिती समोर आणण्याचा निर्णय घेतला.