आज महाराष्ट्रातील 20,000 हून अधिक बार-परमिट रूम्स बंद, कारण काय?

Maharashtra Bar Bandh

Maharashtra Bar Bandh | महाराष्ट्रातील 20,000 पेक्षा जास्त बार आणि परमिट रूम्स आज (14 जुलै) बंद (Maharashtra Bar Bandh) राहतील, अशी घोषणा इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (AHAR) केली आहे. राज्य सरकारच्या कर प्रणालीविरुद्धचा निषेध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

करवाढीचा फटका

एएचएआरनुसार, गेल्या वर्षात दारूवरील व्हॅट 10%, वार्षिक परवाना शुल्क 15% आणि उत्पादन शुल्क 60% ने वाढवण्यात आले. यामुळे 1.5 लाख कोटी रुपयांचा हा उद्योग कोसळण्याच्या मार्गावर आहे, असा दावा संघटनेने केला. एएचएआरचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी म्हणाले, “हा उद्योग संकटात सापडला आहे. आमच्या विनंत्यांकडे लक्ष दिले जात नाही, म्हणून 14 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रातील बार बंद राहतील.”

कोविडनंतरच्या पुनर्प्राप्तीच्या काळात या करवाढीने लहान-मोठ्या व्यवसायांसाठी आव्हान निर्माण झाले आहे. एएचएआरचे म्हणणे आहे की, 20 लाखांहून अधिक लोकांना रोजगार देणारा हा उद्योग आणि 48,000 विक्रेत्यांचा आधार असलेला व्यवसाय धोक्यात आहे. करवाढीमुळे बेरोजगारी वाढण्याची भीती असून, शेजारील राज्यांत दारू तस्करीला चालना मिळू शकते.

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI), HRAWI आणि महाराष्ट्रातील हॉटेल-रेस्टॉरंट संघटनांनी या बंदाला पाठिंबा दिला आहे. याचा फटका महाराष्ट्रातील पर्यटनालाही बसण्याची शक्यता आहे.