कोल्हापूर – शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. यासाठी १२ जिल्ह्यांमध्ये काही दिवसापूर्वी चक्काजाम आंदोलन ही करण्यात आले. तर महामार्ग रद्द व्हावा यासाठी महाविकास आघाडीचे नेत्यांनी पंढरपुरात विठ्ठलाल साकडे घातले. पण शेतकऱ्यांचा विरोध असताना ही शक्तिपीठच्या समर्थनात भाजपाने आज कोल्हापुरात मोर्चा काढला.
मुख्य मार्गावरून हातात फलक घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. चंदगडचे भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लजमध्ये हा मोर्चा निघाला. या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांसह, पदाधिकारी सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अधिकाऱ्यांना शक्तिपीठ महामार्गासाठी निवेदन देण्यात आले. तर दोन दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठच्या समर्थनार्थ मुंबईत बैठक घेतली होती. या बैठकीत ३५ लोकांनी सात-बारा शासनाकडे जमीन संपादनास दिले असल्याचे सांगण्यात आले.
आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले की, समृद्धी महामार्गालाही सुरुवातीला विरोध होता, पण आज तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाग बनलाय. चंदगडसारख्या भागात विकास हवा आहे. गोवा आणि बेळगाव जवळ असूनही चंदगड मागे आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यटन आणि रोजगार वाढेल. शक्तीपीठ महामार्गामुळे मोठा विकास होणार आहे. हे आंदोलन किंवा मोर्चा नाही केवळ सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ आम्ही रॅली काढली आहे. काँग्रेस नेते व माजी मंत्री सतेज पाटील हे विरोधी गटातील नेते आहेत. पण त्यांनाही माहित आहे. या भागाला विकास हवा आहे. त्यामुळे त्यांचे काही जास्त मनावर घेऊ नका. ते सुद्धा महामार्ग झाल्यावर सरकारचे अभिनंदन करतील. कोण राजू शेट्टी? ते काय होते, आज त्यांचेच सहकारी त्यांच्यासोबत आहेत का ?त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीवेळी त्यांचे कार्यकर्ते कारखानदारांसोबत होते. त्यांच्या याच स्वभामुळे त्यांचे कार्यकर्ते सोडून गेले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी म्हणाले की, कोल्हापुरात १ हजार शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गास संमती दिली असल्याचा कांगावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यामध्ये त्यांचा ढोंगीपणा समोर आला आहे.३५ शेतकऱ्यांनीच सात-बारा दिले असून १ टक्काही लोकांचे शक्तिपीठ महामार्गास समर्थन नाही.