पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळू हळू रंगत येत आहे. नेहमीप्रमाणे निवडणूक आली की नोकऱ्या देण्याबाबत घोषणा होतात त्याच पद्धतीने बिहारमध्ये १ कोटी सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. या नोकऱ्या कंत्राटाच्या माध्यमातून देणार की थेट सरकारी नोकरी देणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
राज्यातील तरुणांमध्ये नोकरी मिळवण्यासाठीचे कौशल्य विकसित व्हावे यासाठी येत्या पाच वर्षात एक कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. या विद्यापीठाला माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे नाव देण्यात येणार आहे.
समाजमाध्यमावर टाकलेल्या आपल्या लांबलचक पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी ही घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या सरकारच्या गेल्या वीस वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्याच्या कारभारात अधिकाधिक तरुणांना सरकारी नोकरी देण्याचे आमचे धोरण राहिलेले आहे. २००५ ते २०२० या काळात आठ लाख तरुणांना सरकारी नोकरी मिळाली आहे. आतापर्यंत १० लाख विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी तर ३९ लाख तरुणांना रोजगार मिळाला आहे. येत्या पाच वर्षात राज्यातील एक कोटी युवकांना सरकारी नोकरी दिली जाणार आहे. यासाठी खाजगी आस्थापनांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. त्यासाठी तरुणांना या कंपन्यांना आवश्यक असलेले कौशल्य स्विकारले जाणार आहे. बिहारमध्ये रोजगाराचा प्रश्न गंभीर असून त्यामुळे बिहारी तरुणांना रोजगारासाठी राज्याबाहेर जावे लागते. इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण उत्तर प्रदेश व बिहारमध्ये अधिक आहे.