Chala Hawa Yeu Dya New Season | झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पर्वात प्रेक्षकांना अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.
याआधीच्या पर्वात डॉ. निलेश साबळेसह (Nilesh Sable) इतर कलाकारांनी प्रेक्षकांना वेड लागवले होते. पण यावेळी शोमध्ये मोठा बदल झाला आहे. यंदाच्या पर्वात डॉ. निलेश साबळे यांच्याऐवजी आता अभिनेता अभिजीत खांडकेकर हे सूत्रसंचालन करणार आहे. निलेश साबळे नव्या पर्वात नसल्याने तो शोमधून का बाहेर पडला?असा प्रश्न चाहते विचारू लागले होते. आता एका मुलाखतीत बोलताना त्याने यामागचे कारण सांगितले.
निलेश साबळेंचा शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय
‘एका मुलाखतीत निलेश साबळे यांनी हा बदल स्पष्ट केला. “जेव्हा नवीन पर्वाची योजना आली, तेव्हा चॅनेलने माझ्याशी चर्चा केली होती. पण मी सध्या एका सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे, ज्यात भाऊ कदमही आहेत. शूटिंग अजून दीड-दोन महिने चालेल. त्यामुळे माझ्या तारखा जुळवणे कठीण झाले आणि मी या पर्वात सहभागी होऊ शकलो नाही,” असे त्यांनी सांगितले.
अभिजीत खांडकेकरबाबत तो म्हणाला की, “आम्ही ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’पासून एकत्र आहोत. तो गोड आणि हुशार अभिनेता आहे. त्याने स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं आहे. या शोला तो नक्कीच नव्या उंचीवर नेईल,”
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’चे नवीन पर्व 26 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. यंदा हा शो नवीन फॉर्मेटमध्ये असणार आहे. अभिजीत खांडकेकरसोबत श्रेया बुगडे, प्रियदर्शन जाधव, गौरव मोरे, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके हे कलाकार देखील शोमध्ये असतील.