‘तुम्हाला डिक्शनरीची गरज आहे…’अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापकांवरील तपासावरून न्यायालयाने एसआयटीला फटकारले

Ashoka University Professor Case

Ashoka University Professor Case | अशोका विद्यापीठाचे (Ashoka University) प्राध्यापक अली खान महमूदाबाद (Ali Khan Mahmudabad) यांच्या सोशल मीडिया पोस्टवरील हरियाणातील एसआयटीच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’वर त्यांनी केलेल्या टिप्पणीवरून हा वाद सुरू आहे.

न्यायालयानं म्हटलं की, “एसआयटी पूर्णपणे भरकटली आहे.” त्यांनी प्राध्यापक अली खान यांच्या पुढील समन्सवर तूर्त बंदी घातली. तसेच, “तुम्हाला त्यांची गरज नाही, तर डिक्शनरीची गरज आहे, अशा शब्दात न्यायालयाने एसआयटीला फटकारले.

तपासावर प्रश्नचिन्ह

अली खान महमूदाबाद यांच्या वादग्रस्त पोस्टची चौकशी करणाऱ्या एसआयटीवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठानं ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्ट केलं की, तपास फक्त दोन एफआयआरपुरता मर्यादित राहील आणि प्राध्यापकांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची गरज नाही. पुढील चार आठवड्यांत तपास पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले. न्यायालयानं सांगितलं की, प्राध्यापक इतर विषयांवर लिहिण्यास स्वतंत्र आहेत, फक्त या प्रकरणाशी निगडित गोष्टींवर लिहू नये.

वादग्रस्त पोस्ट आणि अटक

अली यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, महिलांचं कौतुक बरोबर आहे, पण इतर नागरिकांना होणाऱ्या अन्यायाकडेही लक्ष द्यावं, नाही तर हा ढोंगीपणा ठरेल. यावरून मोठा वाद पेटला आणि त्यांना अटक झाली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयानं अटींसह त्यांना जामीन दिला होता

प्राध्यापकांचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितलं की, एसआयटीनं त्यांच्या 10 वर्षांच्या प्रवासाबाबतही विचारपूस केली. यावर न्यायालयानं सरकारी वकिलांना सुनावलं की, तपास योग्य दिशेने हवा. न्यायालयानं म्हटलं, “एसआयटीचं काम फक्त या दोन पोस्टच्या शब्दांचा अर्थ समजून घेणं आहे, त्यापलीकडे जाऊ नये.”

राष्ट्रीय महिला आयोगानं अली यांच्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांचं म्हणणं होतं की, ही पोस्ट सैन्यातील महिलांचा अपमान करते. पण अली यांनी याला ‘गैरसमज’ ठरवत म्हटलं, “मला आश्चर्य वाटतं की, आयोगानं माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला.” याआधी न्यायालयानं ही पोस्ट ‘प्रसिद्धी’चा प्रयत्न ठरवली होती आणि असा वेळात अभिवक्त्रय स्वातंत्र्याचा वापर योग्य नाही, असं मत मांडले होते.

हे देखील वाचा –

हनीट्रॅपच्या माध्यमातून राज्यातले गोपनीय दस्तऐवज बाहेर येत आहेत ! पटोलेंचा खळबळजनक दावा

‘तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे’, फडणवीसांची उद्धव ठाकरेंना थेट ऑफर; ठाकरे म्हणाले…

Israel attacks Syria: इस्त्रायलने सीरियावर हल्ला का केला? थेट लष्कराला लक्ष्य करण्याचे कारण काय? जाणून घ्या