वाघ येतोय ! राज ठाकरेंची उद्या भाईंदरला जाहीर सभा

Raj Thackeray's public meeting in Bhayander

मुंबई – मीरा-भाईंदरमध्ये (Mira-Bhayander) अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray)हे उद्या सभा घेणार आहेत. मीरा रोड पूर्व येथे जिथे मोर्चा काढण्यात आलात्या शांती मैदानात ही सभा संध्याकाळी ६ वाजता होणार आहे, अशी माहिती मनसेने अधिकृत एक्स (X) पोस्टवरून दिली आहे. मनसेने या पोस्टमधून एक पोस्टरही प्रसिद्ध केले आहे. त्यात वाघ मीरा-भाईंदरमध्ये येत आहे, असे म्हटले आहे.

मराठी भाषा बोलण्याच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदर येथील एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्याला उत्तर म्हणून ८ जुलै रोजी मनसे व काही संघटनांनी मोर्चा आयोजित केला होता. पोलिसांनी सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांसह मनसेच्या नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, कार्यकर्त्यांच्या संतापानंतर अखेर मोर्चाला तत्काळ परवानगी दिली होती. त्यानंतर मराठी भाषिक या मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. याच ठिकाणी आता राज ठाकरे सभा घेऊन मीरा-भाईंदरमधील मराठी जनतेचे आभार मानणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे.

या सभेबद्दल मनसेने एक्स पोस्ट करत म्हटले आहे की, वाघ मीरा – भाईंदरमध्ये येत आहे. मीरा -भाईंदरमध्ये मराठी बोलणार नाही, अशी मुजोरी दाखवणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला महाराष्ट्र सैनिकांनी दणका दाखवला. त्याठिकाणी मराठीचा मोर्चा नाकारून घोडचूक करणाऱ्या सरकारला विराट मोर्चामधून मराठी एकजुटीची शक्ती दाखवली. त्याच मीरा-भाईंदरमध्ये उद्या या देशातील मराठीचा सगळ्यात बुलंद आवाज घुमणार आहे.