Baramati News: मॅनेजरने बँकेतच केली आत्महत्या, सुसाईड नोटमधून समोर आले कारण

Baramati News

Baramati News | पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भिगवण रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेचे व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी बँकेच्या शाखेतच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मित्रा यांनी बँकेच्या शाखेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे रहिवासी असलेल्या मित्रा बँक ऑफ बडोदामध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

सुसाईड नोटमधून समोर आले आत्महत्येचे कारण

आत्महत्येपूर्वी शिवशंकर यांनी एक चिठ्ठी लिहून आपल्या निर्णयाचं कारण स्पष्ट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, “मी शिवशंकर मित्रा, बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापक बारामती, मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत आहे, माझं बॅंकेला आवाहन आहे की, कर्मचाऱ्यांवर इतका दबाव टाकू नये. सर्वांना आपल्या जबाबादाऱ्यांची जाणीव आहे, प्रत्येक जण आपलं 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतोय.”

त्यांनी पुढे लिहिलं की, “मी शुद्धीत असताना आणि स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेतला आहे. माझ्या कुटुंबाची यात चूक नाही, कोणालाही दोष देऊ नका. फक्त बँकेच्या दबावामुळे मी हा निर्णय घेतला आहे.” त्यांनी आपली पत्नी प्रिया आणि मुलगी माही यांना “प्रिया, मला माफ कर. माही, मला माफ कर!” असं भावनिक संदेशही लिहिला, ज्याने सर्वांना हादरवलं. शिवशंकर यांनी चिठ्ठीत आपले डोळे दान करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे

रिपोर्टनुसार, शिवशंकर गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ताणामुळे त्रस्त होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज पाच-सहा दिवसांपूर्वी बँकेत दिला होता, पण त्याला वरिष्ठांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नोकरी सोडून तणावातून मुक्त होण्याची त्यांची इच्छा होती.

हे देखील वाचा –

IND vs ENG 4th Test: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात बुमराह खेळणार का? कोचने दिली महत्त्वाची माहिती

विधानभवनात राडा! जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांत हाणामारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातात पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राच्या दाव्यावर AAIB ने दिले उत्तर