मुंबई- राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी, हातवारे नको… आवाज खाली…बोलता येत असेल तर बोलायचे… नाहीतर बाहेर जा, अशा शब्दांत पोलिसांना दमदाटी केली. यावेळी पोलीस स्थानकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काल विधानभवनात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर अटक केलेले आव्हाड समर्थक नीतीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याचे कळल्याने रोहित पवार तिथे पोहोचले. यावेळी पोलीस अधिकार्याच्या उत्तराने रोहित पवार संतापले. त्यानंतर त्यांचा पोलिसांशी वाद झाला.
रोहित पवार याविषयी नंतर म्हणाले की, आम्ही आझाद मैदान पोलीस स्थानकात गेलो होतो. तिथे असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना नेमके काय चालले आहे, ते कळत नव्हते. ते झोपेत होते की वेगळे काही हे मला सांगता नाही येणार. आम्ही त्यांना जितेंद्र आव्हाडांचा कट्टर कार्यकर्ता नितीन देशमुख कुठे आहे हे आम्ही विचारले. तर काय, कुठे… माहिती नाही म्हणाले, असे त्यांनी उत्तर दिले. आम्हाला पोलीस आयुक्तांनी देशमुख तिथे असल्याचे सांगितल्याने आम्ही तिथे गेलो होतो. यावेळी तिथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने हातवारे करत ऐका..असे म्हटत होता. यावरूनच माझा संताप उडाला. लोकप्रतिनिधींशी पोलीस असे वागत असतील तर गरीब जनतेला ताटकळतच ठेवाल.