मुंबई- निवडणुकीच्या प्रचार काळात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या विषयीच्या प्रेमाचे कढ येणारे व पुतळे व मंदिरांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांविषयीचा आदर दाखवणाऱ्या केंद्र सरकारच्या (Central government)सीबीएसई अभ्यासक्रमात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी केवळ ६८ शब्द आहेत. विधानपरिषदेतील आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी विधानपरिषदेत हा प्रश्न उपस्थित केला. हा मुद्दा सीबीएसई (CBSE) कडे त्याचप्रमाणे आसीएसई बोर्डासमोर मांडण्यात येईल असे आश्वासन प्राथमिक शिक्षण मंत्री पंकज भोईर यांनी दिले.
सत्यजित तांबे म्हणाले की, मोगलांचा इतिहास पुसता पुसता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा हा प्रकार आहे . हिंदी सक्ती व शिवाजी महाराजांचा इतिहास न शिकवणे यामधून केंद्र सरकार नेमके काय साधत आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात शासनाने काय केले असा प्रश्नही तांबे यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना मंत्री भोयर म्हणाले की, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या आधीही केंद्रीय शिक्षणमंत्री व राज्याच्या शिक्षण मंत्र्यांशी चर्चा झाली होती. त्यावेळी इयत्ता सातवी ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अंतर्भूत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यावर अद्यापही काही कारवाई झाली नाही. राज्याच्या शिक्षण संशोधन विभागानेही राष्ट्रीय शिक्षण संस्थेकडे आवश्यक असलेली माहिती पुरवली आहे. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्यासाठी होणाऱ्या विलंबाबाबत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांनीही सरकारला घरचा अहेर दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्राधान्याने शिकवायला हवा असताना त्याचा अंतर्भावच न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर भावना गवळी यांच्याच नेतृत्वाखाली दिल्लीत शिष्टमंडळ नेण्याचे आश्वासनही भोयर यांनी दिले.