नवी दिल्ली – एअर इंडियाच्या विमानाला (Air India flight) गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातासंबंधी निराधार आणि तथ्यहीन वृत्त प्रसारित केल्याबद्दल फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (FIP) या संघटनेने अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्सला कायदेशीर नोटिसा पाठविल्या असून संबंधितांनी बिनशर्त माफी मागावी , अशी मागणी केली आहे.
१२ जून रोजी झालेल्या या अपघाताची (Ahmedabad plane crash) चौकशी करणाऱ्या विमान अपघात तपास संस्थेने (AAIB) काही दिवसांपूर्वी आपला प्राथमिक अहवाल सादर केला. या अहवालामध्ये अपघातग्रस्त विमानातील दोन वैमानिकांमध्ये शेवटच्या क्षणी झालेल्या संभाषणाचा उल्लेख आहे. मात्र अहवालात कुठेही वैमानिकांना दोषी ठरविण्यात आलेले नाही. परंतु वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्स यांनी अज्ञात स्त्रोतांच्या हवाल्याने वैमानिकाने जाणूनबुजून इंधन स्विच बंद केला. त्यामुळे अपघात झाला, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
याला आक्षेप घेत एफआयपीने त्यांना या नोटिसा बजावल्या आहेत. अशा प्रकारे वृत्तांकन करणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे असून त्यामुळे या भीषण अपघातात प्राण गमावलेल्या वैमानिकांच्या प्रामाणिकपणावरच संशय घेण्यात आला आहे. त्याचे अत्यंत प्रतिकूल परिणाम त्यांच्या कुटुंबियांवर आणि अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांवर झाले आहेत. सबब संबंधितांनी माफी मागावी, असे नोटिशीत म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डच्या (एनटीएसबी) प्रमुख जेनिफर होमेंडी यांनी कालच या विमान अपघाताचे वृत्तांकन करताना जबाबदारीचे भान राखा,अशी ताकीद माध्यमांना दिली होती. एएआयबीने केलेल्या तपासाचे आणि सादर केलेल्या प्राथमिक अहवालाचेही होमेंडी यांनी समर्थन केले होते