Best Electric Cars: टेस्ला खरेदी करण्याचा विचार आहे? त्याआधी पाहा 10 लाखांच्या बजेटमधील ‘या’ सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार

Tesla Car Price

Tesla Car Price: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने भारतात एन्ट्री केली आहे. नुकतेच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC) टेस्लाचे पहिले शोरूम सुरू झाले. टेस्लाच्या या पाऊलामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रीमियम सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.

तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी भारतीय बाजारातील टेस्लाच्या ‘Model Y’ ची किंमत व 10 लाखांच्या बजेटमधील इलेक्ट्रिक कारविषयी जाणून घ्यायला हवे.

‘Model Y’ SUV ची किंमत आणि वैशिष्ट्ये

टेस्लाने भारतात आपली पहिली गाडी ‘Tesla Model Y’ ही इलेक्ट्रिक SUV लाँच केली आहे. ही कार दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.
‘Rear-Wheel Drive’ व्हेरिएंटची किंमत 59.89 लाख रुपये आहे, तर ‘Long Range Rear-Wheel Drive’ व्हेरिएंटची किंमत 67.89 लाख रुपये इतकी आहे. रंगानुसार कारची किंमत 71 लाख रुपयांपर्यंत जाते.

‘Model Y’ ही एक मध्यम आकाराची SUV असून, जागतिक बाजारात ती सर्वाधिक विकली जाणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सपैकी एक आहे. भारतात ती BYD Sealion 7 आणि BMW iX1 सारख्या गाड्यांना थेट टक्कर देणार आहे.

टेस्लाला आव्हान देणाऱ्या परवडणाऱ्या भारतीय इलेक्ट्रिक गाड्या

भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात आधीपासून काही लोकप्रिय आणि परवडणाऱ्या पर्यायांचा दबदबा आहे. या गाड्या टेस्लाच्या तुलनेत स्वस्त असल्या, तरी त्यांचा वापर अधिक व्यापक आहे.

Tata Punch EV – ही टाटा कंपनीची SUV स्टाईल इलेक्ट्रिक गाडी सध्या भारतातील सर्वाधिक विकली जाणारी EV आहे.
यामध्ये 25 kWh (रेंज: 265 किलोमीटर) आणि 35 kWh (रेंज: 365 किलोमीटर) हे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळतात. टाटा Punch EV ची किंमत 9.99 लाख रुपये पासून सुरू होते. छोट्या कुटुंबांसाठी आणि शहरातील वापरासाठी ही गाडी अतिशय उपयुक्त ठरते.

Tata Tiago EV- ही एक कॉम्पॅक्ट आणि बजेट-फ्रेंडली गाडी आहे. Tiago EV ची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे.
या गाडीत 19.2 kWh (रेंज: 223 किलोमीटर) आणि 24 kWh (रेंज: 293 किलोमीटर) असे दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत. शहरातील दैनंदिन वापरासाठी Tiago EV एक आदर्श पर्याय आहे.

MG Comet EV – ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाडी मानली जाते. फक्त 4.99 लाख रुपये पासून सुरू होणारी ही EV विशेषतः अल्प अंतरासाठी वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. या गाडीत Battery as a Service म्हणजेच भाड्याने बॅटरी वापरण्याचा पर्याय आहे. यामध्ये प्रति किलोमीटर 2.5 रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे बजेट ग्राहकांसाठी ही गाडी विशेष आकर्षक ठरते.