Andhra Pradesh Liquor Scam: आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी सरकारच्या कार्यकाळातील कथित 3,500 कोटींच्या दारू घोटाळ्या प्रकरणी (Andhra Pradesh Liquor Scam) विशेष तपास पथकाने प्राथमिक आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी (Y. S. Jagan Mohan Reddy) यांचे नाव देखील आहे.
जगन मोहन रेड्डी यांच्यावर या आरोपपत्रात लाच घेतल्याचा आरोप आहे. मात्र, त्यांना अजूनही थेट आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नाही. या प्रकरणी वायएसआरसीपीचे खासदार पी.व्ही. मिथुन रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपपत्रात काय म्हटलं आहे?
SIT ने न्यायालयात 305 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात 2019 ते 2024 या काळात डिस्टिलरीजमधून दरमहा अंदाजे 50 ते 60 कोटी रुपये गोळा करून, ते शेल कंपन्यांमार्फत फिरवले गेल्याचे म्हटले आहे. या रकमांचा वापर राजकीय पक्षासाठी निधी उभारण्यासाठी केला गेल्याचेही निदर्शनास आले आहे.
आरोपपत्रात असेही नमूद आहे की, यामधून 250 ते 300 कोटी रुपये रोकड स्वरूपात वायएसआरसीपीच्या निवडणूक प्रचारासाठी वापरले गेले. या सगळ्या आर्थिक व्यवहारामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सल्लागार राज केसिरेड्डी हे मुख्य सूत्रधार होते. त्यांनी शासकीय उत्पादन शुल्क धोरणात बदल करत ‘ऑर्डर फॉर सप्लाय’ प्रणाली हाताळण्याचे नियंत्रण मिळवले.
SIT चा पुढील दावा आणि कारवाई
तपास पथकाने 16 व्यक्तींच्या नावांचा समावेश केलेला असून उर्वरित 32 आरोपींसाठी पुढील 20 दिवसांत दुसरे आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. याशिवाय, SIT ने सुमारे 62 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता आणि रोकड स्वरूपात जप्ती केली असून 268 साक्षीदारांची चौकशी पूर्ण केली आहे.
याच प्रकरणात वायएसआरसीपीचे खासदार पी. व्ही. मिथुन रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे. आरोप आहे की त्यांनी या घोटाळ्याच्या आराखड्यापासून अंमलबजावणीपर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
जगन मोहन रेड्डींची प्रतिक्रिया
SIT च्या कारवाईनंतर माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, “ही संपूर्ण कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून लोकप्रतिनिधींना गप्प बसवण्यासाठी आखलेले षड्यंत्र आहे.” त्यांनी याला “माध्यमांसाठी तयार केलेली कथा” असे संबोधले आणि सत्ताधारी TDP सरकारवर खोटे खटले उभे करण्याचा आरोप केला.
हे देखील वाचा –
Pravin Darekar: क्षमतेपेक्षा जास्त लोकं आत घुसले, प्रवीण दरेकरांसह 17 जण 20 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले