छत्रपती संभाजीनगर- मंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरावर एका मद्यधुंद तरुणाने हल्ला केला. ही घटना काल मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. या तरुणाने शिरसाटांच्या बंगल्यावर दगडफेक करत शिवीगाळ केली. त्याने आरडाओरड करून मोठा गोंधळ घातला. सुरुवातीला त्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तरीही त्याने घरावर दगड फेकले. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सौरभ घुले असे आरोपीचे नाव आहे. तो काल मध्यरात्री शिरसाट यांच्या निवासस्थानाजवळ आला व त्याने शिरसाटांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला सुरक्षारक्षकांनी थांबण्याचा प्रयत्न केला मात्र, तरुणाने त्यांनाही दाद दिली नाही. या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर येथील सातारा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणावर याआधी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात येते. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
