भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदासाठी झेवी – पेप गार्डिओलाने खरच अर्ज केला का? AIFF ने दिली महत्त्वाची माहिती

AIFF Indian Football Coach Selection

AIFF Indian Football Coach Selection: अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) सध्या राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी (Indian Football Team)प्रशिक्षकाच्या शोधात आहेत. यासाठी अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. नुकतेच, भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदासाठी दिग्गज कोच झेवी हर्नांडेझ ((Xavi Hernandez)) आणि पेप गार्डिओ (Pep Guardiola) यांनी अर्ज केल्याचा दावा केला जात होता. मात्र, हे अर्ज बनावट असल्याची माहिती समोर आली आहे.

AIFF ने भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी झेवी हर्नांडेझ आणि पेप गार्डिओला यांच्याकडून आलेले अर्ज खरे नव्हते, असे स्पष्ट केले आहे. या अर्जांची सत्यता तपासल्यानंतर हे अर्ज बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

महासंघाच्या तांत्रिक समितीच्या बैठकीनंतर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्यात स्पष्ट करण्यात आले की, झेवी आणि गार्डिओला यांच्या नावाने आलेले अर्ज ईमेलद्वारे मिळाले होते, मात्र त्यांची पडताळणी करता आली नाही. नंतर हे अर्ज खोटे असल्याचे स्पष्ट झाले.

काही दिवसांपूर्वी अनेक माध्यमांनी झेवीने भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचे वृत्त दिले होते, ज्यामुळे भारतीय फुटबॉल वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. परंतु आता AIFF ने त्या अफवांना पूर्णविराम दिला आहे आणि पुन्हा एकदा वास्तवावर लक्ष केंद्रित केले आहे.

नवीन प्रशिक्षक निवडीसाठी 3 नावांची शिफारस

मुख्य प्रशिक्षकपदासाठी (AIFF Indian Football Coach Selection) एकूण 170 अर्ज प्राप्त झाल्यानंतर AIFF च्या तांत्रिक समितीने स्टीफन कॉन्स्टंटाईन, स्टीफन तारकोविक आणि खालिद जमील या तिघांची शिफारस केली आहे. यातील कॉन्स्टंटाईन यांचा भारतीय संघासोबत पूर्वीचा अनुभव असून, तारकोविक यांच्याकडे युरोपीय अनुभव आहे. मात्र, देशांतर्गत फुटबॉलमधील सखोल जाण असल्याने खालिद जमील यांचे नाव विशेष लक्षवेधी ठरले आहे.

AIFF च्या मतानुसार, भारतासारख्या देशासाठी प्रशिक्षक निवडताना तांत्रिक ज्ञानासोबतच भारतीय आणि आशियाई फुटबॉल संस्कृतीची समज असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय संघाचे संचालक सुब्रतो पॉल यांनी सांगितले की, “भारतीय फुटबॉलसाठी हा निर्णायक क्षण आहे. आम्हाला असा प्रशिक्षक हवा आहे जो फक्त तांत्रिकदृष्ट्या सशक्त नसावा, तर आपल्या खेळाडूंशी सहज जुळणारा आणि देशाच्या शैलीला समजून घेणारा असावा.”

सध्याची कामगिरी आणि तातडीची गरज

भारताची सध्याची FIFA क्रमवारी 133 असून, ही गेल्या 9 वर्षांतील सर्वात खालची स्थिती आहे. माजी प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्यानंतर तात्पुरते प्रशिक्षक मनोलोज मार्केज यांनी जबाबदारी सांभाळली होती, पण अपयशानंतर त्यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे संघाची कामगिरी उंचावण्यासाठी नव्या प्रशिक्षकाची तातडीने गरज निर्माण झाली आहे.