सावधान! ChatGPT ला तुमचे गुपीत सांगताय? सॅम ऑल्टमनने दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

ChatGPT Privacy

ChatGPT Privacy: चॅटजीपीटी, जेमिनी, ग्रोक सारख्या जनरेटिव्ह एआय चॅटबॉटचा वापर वाढला आहे. अनेकजण कायदेशीर, आर्थिक सल्ल्यापासून ते वैयक्तिक माहिती देखील या चॅटबॉटशी शेअर करत असतात. तुम्ही देखील चॅटजीपीटीसोबत तुमच्या वैयक्तिक भावना शेअर करत असाल, तर थांबा आणि विचार करा.

ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी स्पष्टपणे मान्य केले आहे की, सध्या AI चॅट्सना (ChatGPT Privacy) डॉक्टर, वकील किंवा थेरपिस्टसोबतच्या संवादाइतकी कायदेशीर गोपनीयता मिळालेली नाही. तुमच्या चॅट्सचा वापर न्यायालयात पुरावा म्हणून केला जाऊ शकतो.

संवाद गोपनीय नाही, न्यायालयात पुरावा म्हणून वापर होऊ शकतो

‘दिस पास्ट वीकेंड’ या पॉडकास्टमध्ये बोलताना ऑल्टमन यांनी सांगितले की, अनेक तरुण यूजर्स चॅटजीपीटीचा वापर वैयक्तिक सल्ला घेण्यासाठी करतात. प्रेमसंबंध, करिअर, मानसिक आरोग्य यासारख्या बाबतीत प्रश्न विचारले जातात. मात्र, सध्या असे संवाद कायदेशीरदृष्ट्या संरक्षित नाहीत. डॉक्टर-रुग्ण गोपनीयता जशी असते, तशी एआय चॅटसाठी सध्या कोणतीही कायदेशीर हमी नाही.

ऑल्टमन यांनी इशारा दिला की, न्यायालयाने आदेश दिल्यास चॅटजीपीटीचे संवाद उघड होऊ शकतात. यामुळे यूजर्सची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझ्या मते हे चुकीचे आहे. थेरपिस्टसारखीच गोपनीयता एआयसाठीही लागू झाली पाहिजे.”

न्यायालयीन लढाई आणि डेटा स्टोरेजचा प्रश्न

सध्या ओपनएआय ‘द न्यूयॉर्क टाइम्स’सोबत एका कॉपीराइट प्रकरणात न्यायालयात आहे. यामध्ये मागणी करण्यात आली आहे की, यूजर्सचे हटवलेले चॅट्सही जतन करून ठेवावेत. याला ओपनएआयने असा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले असून, त्यावर अपील दाखल केले आहे.

ओपनएआयचा दावा आहे की, जर कायदेशीर (ChatGPT Privacy) किंवा सुरक्षेची गरज नसेल तर अकाउंट्समधील चॅट्स 30 दिवसांत काढून टाकले जातात. मात्र, हे चॅट्स पूर्णतः एनक्रिप्टेड नसल्याने, कंपनीचे कर्मचारी त्यांना पाहू शकतात. त्यामुळे गोपनीयतेचा प्रश्न अधिक गंभीर ठरतो.

AI थेरपिस्ट नाही, विचारपूर्वक वापरा

AI हे साधन थेरपिस्ट नाही, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. चॅटजीपीटीसोबत अत्यंत वैयक्तिक अनुभव शेअर करताना कायदेशीर संरचना आणि गोपनीयतेच्या मर्यादा लक्षात घ्या. ऑल्टमन यांच्या मते, या संवादांना कायदेशीर संरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे, आणि याकडे उद्योग गंभीरपणे पाहू लागला आहे.