American Airlines Plane Fire: अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात आग, करावे लागले इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

American Airlines Plane Fire

American Airlines Plane Fire: अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर सातत्याने विमान प्रवास करतानाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. सातत्याने विमान अपघाताच्या घटना समोर येत आहेत. आता अमेरिकेत एका विमानाला (American Airlines Plane Fire) उड्डाणावेळी आग लागल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना दुखापत झाली नाही.

अमेरिकेतील डेन्व्हर विमानतळावर अमेरिकन एअरलाईन्सच्या (American Airlines) एका विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले, कारण लँडिंग गियरमध्ये (landing gear) बिघाड झाल्याने अचानक आग लागली व धूर निघू लागला.

लँडिंग गियरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर ही घटना घडली. यानंतर 173 प्रवाशांना त्वरित बाहेर काढण्यात आले.केवळ एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली.

बोईंग 737 मॅक्स 8 प्रकारातील एए-3023 विमान डेन्व्हरहून मियामीकडे जाणार होते. उड्डाणाच्या तयारीदरम्यान लँडिंग गियरच्या टायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग निर्माण लागली. त्यानंतर तातडीने प्रवाशांना खाली उतरवून बसमार्फत टर्मिनलपर्यंत नेण्यात आले.

व्हिडिओ व्हायरल, प्रवाशाचा कृतीवरून संताप

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात प्रवासी घाबरून स्लाईडवरून खाली येताना दिसत आहेत, तर विमानाच्या चाकाजवळून धूर निघताना स्पष्ट दिसतो. एका प्रवाशावर मात्र टीका होत आहे, कारण तो विमानातून उतरताना एका हातात मुलाला आणि दुसऱ्या हातात सामान घेऊन उतरताना दिसतो.

विमानतळ प्रशासन व अग्निशमन यंत्रणा तत्पर

डेन्व्हर विमानतळ प्रशासनाने त्वरित आपत्कालीन यंत्रणांना सक्रिय केले. ‘फर्स्ट रेस्पॉंडर्स’ आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. पाच प्रवाशांची घटनास्थळी तपासणी करण्यात आली, त्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासली नाही.

अमेरिकन एअरलाईन्सकडून स्पष्टीकरण

एअरलाईन्सकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, लँडिंग गियरच्या टायरमध्ये तांत्रिक समस्या होती. या घटनेनंतर विमान सेवेतून तातडीने बाहेर काढण्यात आले असून, देखभाल टीमद्वारे तपासणी केली जात आहे. सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित असल्याची खात्री दिली गेली आहे.