Mallikarjun Kharge: ‘5 वर्ष मेहनत मी केली, पण…’, मुख्यमंत्रीपद हुकल्याची मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलून दाखवली खंत; म्हणाले…

Mallikarjun Kharge on Karnataka CM Post

Mallikarjun Kharge on Karnataka CM Post: काँग्रेस अध्यक्ष आणि गांधी कुटुंबाचे विश्वासू नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री (Karnataka CM Post) न होता आल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. विजयपुरामधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 1999 मध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री न बनवण्यात आल्याबद्दल सांगितले.

त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, त्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी मेहनत घेतली, पण एक नवखा नेता केवळ चार महिन्यांपूर्वी पक्षात दाखल होऊन मुख्यमंत्री बनला.

“मी मेहनत केली, सत्ता आणली; पण मुख्यमंत्री दुसराच झाला”

खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले, “विधानमंडळ पक्षाचे नेतृत्व माझ्याकडे होतं. मी राज्यात काँग्रेसचं सरकार आणण्यासाठी पाच वर्षे मेहनत केली. पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनले ते असे नेते जे फक्त चार महिन्यांपूर्वी पक्षात आले होते. त्यामुळे माझी मेहनत वाया गेल्यासारखी वाटली.”

ही टीका अप्रत्यक्षपणे तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्यावर होती. कृष्णा यांना 1999 मध्ये मुख्यमंत्रीपद मिळालं आणि ते 2004 पर्यंत सत्तेवर राहिले. खरगे त्यावेळी मंत्रिमंडळात होते, पण मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना डावलण्यात आलं

या राजकीय घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी जातीय समीकरणांचा उल्लेख केला. खरगे हे अनुसूचित जातीतील असून, त्यांच्याशी न्याय झाला नाही, अशी भावना त्यावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये होती. त्याउलट एस. एम. कृष्णा हे वोक्कालिगा समाजाचे होते, जो कर्नाटकात प्रभावशाली समजला जातो.

खरगे पुढे म्हणाले, “मी कधीही सत्तेसाठी धावलो नाही. मी ब्लॉक अध्यक्ष होतो, मग आमदार, मंत्री, खासदार आणि अखेर काँग्रेस अध्यक्ष झालो. हा प्रवास मी कर्तव्य म्हणून केला. सत्ता मागितली नाही, ती आपोआप आली.”

त्यांनी आपल्या संयमी राजकीय प्रवासावर भर दिला आणि हे अधोरेखित केलं की, त्यांच्या कामामुळेच पक्षातील सर्वोच्च स्थान त्यांना मिळालं.

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना नवा सूर?

मल्लिकार्जुन खरगेंचं हे वक्तव्य अशा वेळी समोर आलं आहे, जेव्हा कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. बेंगळुरूमध्ये काँग्रेसच्या काही गटांमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या वारंवार समोर येतात. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील सत्ता संघर्षाच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत. अशा पार्श्वभूमीवर खरगेंच्या या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.