अमेरिकेचा नवा डाव! भारताच्या वस्तूंवर शुल्क लादताच पाकिस्तानसोबत केला व्यापार करार; ट्रम्प म्हणाले…

Donald Trump On USA India Trade Deal

Donald Trump On USA India Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर 25 टक्के शुल्क आणि अतिरिक्त दंड लावण्याची घोषणा केली आहे. व्यापार करार (USA India Trade Deal) ठराविक मुदतीत पूर्ण न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, यात घोषणेनंतर काही तासांतच पाकिस्तानसोबत ((USA Pakistan Trade Deal) एक व्यापार करार जाहीर केला.

या करारांतर्गत अमेरिका-पाकिस्तान दोन्ही देश तेल साठ्यांचा विकास करतील, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकू शकतो, त्यांनी अशी विचित्र शक्यताही व्यक्त केली. दुसरीकडे, अमेरिकेने 6 भारतीय तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहे.

ट्रम्प यांची घोषणा

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले की, अमेरिका आणि पाकिस्तान एकत्र तेल साठे विकसित करतील. यासाठी योग्य तेल कंपनीची निवड सुरू आहे. “कोण जाणे, एके दिवशी ते भारतालाही तेल विकतील!” असे त्यांनी नमूद केले. ही घोषणा भारताच्या रशियन तेल खरेदी आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार तुटीमुळे आली आहे. 1 ऑगस्टपासून हे शुल्क लागू होणार आहे.

ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी अनेक देशांच्या नेत्यांशी व्यापार करारांवर चर्चा केली आहे. दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाशी भेट होणार असून, तेथील 25 टक्के शुल्क कमी करण्याची ऑफर ऐकण्यास ते उत्सुक आहेत. अनेक देश शुल्क कपातीसाठी ऑफर देत असून, ही पावले व्यापार तूट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे त्यांनी म्हटले.

भारतावरील निर्बंध

दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इराणशी व्यापार केल्याबद्दल 20 संस्थांवर निर्बंध जाहीर केले, ज्यात भारतातील सहा कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी इराणकडून पेट्रोकेमिकल उत्पादनांची मोठ्या प्रमाणात आयात केल्याचा आरोप आहे. अमेरिकेचा दावा आहे की, इराण हा महसूल दहशतवाद आणि अत्याचारासाठी वापरतो. या कारवाईमुळे व्यापार संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत.