Maharashtra Assembly Elections EVM Tampering Clarification : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (EVM Tampering Clarification) फेरफार झाल्याच्या आरोपांवर भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाने राज्यात वापरलेल्या सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांचा तपास केला. त्यात कोणतीही तफावत आढळली नसल्याचे जाहीर करत आयोगाने निकालांवर शंका घेण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले.
तक्रारींची चौकशी
काँग्रेस नेते राहुल गांधींसह 10 पराभूत उमेदवारांनी तक्रारी दाखल केल्यानंतर ही तपासणी करण्यात आली. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले की, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, पनवेल, अलिबाग, खडकवासला, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि माजलगाव या दहा मतदारसंघांत क्रॉस-चेकिंग करण्यात आले. यात 8 उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, तर दोघांनी अनुपस्थित राहिले.
तपासणीचा अहवाल
तपासणीत 48 बॅलेट युनिट्स, 31 कंट्रोल युनिट्स आणि 31 व्हीव्हीपॅट यंत्रांची पाहणी झाली. मॉक पोलद्वारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची जुळवणी करण्यात आली, जिथे दोन्हीची संख्या बरोबरीत आढळली. कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला आणि माजलगावमध्ये मायक्रोकंट्रोलर आणि मेमरी तपासण्यासाठी निदान चाचण्या घेण्यात आल्या. सर्व यंत्रे योग्यरित्या कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले.
या तपासणीनंतर निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सांगितले की, ईव्हीएम यंत्रांमध्ये कोणतीही छेडछाड करणे शक्य नाही आणि ही यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित आहे. या तपासणीमुळे निवडणुकीच्या निष्पक्षतेवर उपस्थित झालेले प्रश्नचिन्ह संपुष्टात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.