मतांच्या चोरीचा आमच्याकडे ठोस पुरावा! राहुल गांधींची टीका

ahul Gandhi

नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोग (election commision) मतांची चोरी करत आहे. याचा आमच्याकडे ठोस पुरावा असून तो बाहेर काढल्यास मोठा धमाका होईल, असा घणाघात विरोधी पक्ष नेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगातर्फे पुनर्पडताळणी केल्यानंतर आज या याद्या प्रकाशित करण्यात आल्या. त्या संदर्भात राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये गडबड करून मतांची चोरी करत आहे. मी हे उगाच बोलत नाही. माझ्याकडे ठोस पुरावे आहेत. आयोग केवळ भाजपासाठी काम करत आहे. हे काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना शोधून काढू ते सेवानिवृत्त झाले तरी त्यांचा पर्दाफाश करणार. या गैरप्रकारातील तथ्ये जेव्हा आम्ही जनतेसमोर आणू तेव्हा सगळ्यांना कळेल की आयोग कशाप्रकारे काम करत आहे. मध्य प्रदेशात आम्हाला पहिल्यांदा संशय आला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत तो अधिक बळावला. त्यानंतर आम्ही सहा महिन्यांपासून यातील गैरप्रकारांचा शोध घेतला. त्यातून आमच्या हाती जे लागले आहे, ते लोकांसमोर आणले तर मोठा स्फोट होईल. या देशात निवडणूक आयोगच राहणार नाही. आयोगाने तब्बल एक कोटी नवीन मतदारांची भर घातली आहे. हे ज्यांनी त्यांना ते कितीही वरच्या पदावर असले तरी आम्ही त्यांना नक्कीच शोधून काढू. राहुल गांधींच्या या वक्तव्याला भाजपाने प्रत्युत्तर दिले असून त्यांना मते मिळत नाहीत म्हणून ते असे बोलत असल्याचे भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.