नांदेड – नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात एका महिला रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात महिला रुग्ण झोपलेली असताना तिच्या अंगावर उंदीर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे. ही घटना रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याने खळबळ माजली आहे.
हा व्हिडीओ दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकाने रेकॉर्ड केला असून, त्यात केवळ एकच नव्हे तर अनेक उंदीर रुग्णालयाच्या महिला वॉर्डात मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे सरकारी रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणाचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकाराआधीही, तीन दिवसांपूर्वीच नांदेडच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ६३ वर्षीय रमेश यन्नावार यांचा पाय उंदराने कुरतडल्याची घटना घडली होती. मधुमेह असलेल्या रमेश यांना २० जुलै रोजी शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास त्यांचा पाय कुरतडल्याचे त्यांना लक्षात आले, मात्र तोवर उंदीर पसार झाला होता.या घटनांमुळे नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांची दयनीय अवस्था आणि रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.