भारताने रशियन तेल खरेदी थांबवली? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतीय अधिकारी काय म्हणाले? वाचा

भारताने रशियन तेल खरेदी थांबवली? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतीय अधिकारी काय म्हणाले? वाचा

India Russia Oil Trade: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताने रशियाकडून (India Russia Oil Trade) तेल खरेदी थांबवल्याचा दावा केला होता. “मी ऐकले आहे की भारताने आता रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले आहे. मला खात्री नाही, पण हे एक चांगले पाऊल आहे.”, असे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी सुरू करणे ठेवणारच आहे.

ट्रम्प यांनी रशियासोबत भारताचे जवळचे व्यापारी आणि लष्करी संबंधांवर टीका केली होती. याआधी त्यांनी रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादण्याची धमकी दिली होती. याशिवाय, इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या काही भारतीय कंपन्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने तेल कंपन्यांना रशियाकडून होणारी आयात कमी करण्याबाबत कोणताही निर्देश दिलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती आणि जागतिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात.

रशिया मोठा तेल पुरवठादार

पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर रशियन तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. त्याचा फायदा घेत भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी सुरू केली. रशियाकडून कमी किमतीत तेल मिळाल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून, रशियालाही निर्यात महसूल कायम ठेवण्यास मदत झाली आहे. सध्या भारत रशियाकडून सुमारे 35 टक्के तेल आयात करतो आणि जानेवारी ते जून 2025 दरम्यान दररोज 1.75 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले.

ट्रम्प यांचे शुल्क आणि टीका

या आठवड्यात ट्रम्प यांनी 70 देशांच्या निर्यातीवर 25 टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली, ज्यात भारताचा समावेश आहे. त्यांनी भारताच्या रशियन ऊर्जा खरेदीवरून अतिरिक्त शिक्षेची धमकी दिली होती, पण त्याचा उल्लेख शुल्क घोषणेमध्ये नाही.

ट्रम्प यांनी भारतावर टीका करताना सांगितले की, “भारतासोबत आमची मोठी व्यापार तूट आहे आणि त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वाधिक आहे. रशियाकडून ऊर्जा खरेदी करणे हे युक्रेन युद्ध थांबवण्याच्या वेळी चुकीचे आहे.”

तेल खरेदी सुरू राहणार

दोन भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या धमक्या असूनही भारत रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवेल. “हे दीर्घकालीन करार आहेत, जे एका रात्रीत थांबवणे कठीण आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दुसऱ्या अधिकाऱ्याने नमूद केले की, रशियन तेलाच्या आयातीमुळे जागतिक तेल किमती स्थिर राहिल्या आहेत.