‘आम्ही पुन्हा एकदा…’, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप आले एकत्र, घटस्फोटाचा निर्णय मागे घेत म्हणाले…

Saina Nehwal and Parupalli Kashyap

Saina Nehwal and Parupalli Kashyap: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने काही दिवसांपूर्वी पती पारुपल्ली कश्यपसोबत (Parupalli Kashyap) घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र, आता सायना आणि पी कश्यपने विभक्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

गेल्या महिन्यात घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आता सायनाने इन्स्टाग्रामवर कश्यपसोबतचा फोटो शेअर करत नवीन सुरुवात करत असल्याचे म्हटले आहे.

“कधीकधी दुरावा आपल्याला त्या व्यक्तीच्या किमतीची जाणीव करून देतो. आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत,” असे तिने कश्यपसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले.

घटस्फोटाचा निर्णय मागे

गेल्या महिन्यात सायना नेहवालने सोशल मीडियावर पोस्ट करून तिने आणि कश्यपने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. “आयुष्य कधीकधी वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर आम्ही शांतता आणि आत्मविकासासाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला,” असे ती म्हणाली होती. 2018 मध्ये लग्न झालेल्या या जोडीने सात वर्षांनंतर हा निर्णय घेतला होता, पण आता त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचे ठरवले.

कश्यप आणि सायनाचा प्रवास

सायना आणि कश्यप यांनी हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीमध्ये एकत्र प्रशिक्षण घेतले. या काळात त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले व दोघांनी 2018 मध्ये त्यांनी लग्न केले.

सायनाने ऑल्मिपिकमध्ये पदक जिंकले असून, ती जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. तिला 2009 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2010 मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला.

तर दुसरीकडे, कश्यपने 2014 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

हे देखील वाचा –

माघी गणेशोत्सवापासून रखडलेल्या गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन

साबळे अजित पवार गटात ! रायगडमध्ये गोगावलेंना धक्का