Mumbai Metro: मेट्रो ठरली मुंबईची लाईफलाईन! 39 महिन्यांत 20 कोटी प्रवाशांनी केला प्रवास

Mumbai Metro Crosses 20 Crore Passenger Journeys

Mumbai Metro Crosses 20 Crore Passenger Journeys : मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) एक मोठा टप्पा गाठला आहे. मेट्रो मार्ग 2A (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो मार्ग 7 (दहिसर ते गुंदवली) यांनी अवघ्या 39 महिन्यांत 20 कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला आहे.

एकेकाळी प्रवासासाठी लोकल ट्रेनचा जास्तीत जास्त प्रवास करणारे मुंबईकर आता मेट्रोचा देखील वापर करत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. (Mumbai Metro Crosses 20 Crore Passenger Journeys)

2 एप्रिल 2022 रोजी सुरू झालेले हे दोन मेट्रो मार्ग मुंबईच्या रोजच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. पहिल्या दिवशी 19,451 प्रवाशांपासून सुरू झालेला हा प्रवास आता शहराच्या गतीशीलतेचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे.

अवघ्या 9 महिन्यांत मेट्रोने 1 कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला. त्यानंतर, 25 महिन्यांत 10 कोटी आणि 33 महिन्यांत 15 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. आता ऑगस्ट 2025 पर्यंत हा आकडा 20 कोटींवर पोहोचला आहे. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो मार्ग 7 या मार्गावरून सध्या दिवसाला सरासरी 2 लाख 60 हजार प्रवासी प्रवास करतात

या यशाबद्दल मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) आणि महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) यांनी ट्विट करत मुंबईच्या नागरिकांचे आभार मानले आहेत. त्यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचीही प्रशंसा केली, ज्यामुळे हे यश शक्य झाले.

हा विक्रम केवळ आकडेवारीचा नाही, तर मुंबईच्या मेट्रो क्रांतीचा वेगवान प्रवास आहे. मुंबईच्या गतीला व स्वप्नांना पंख देणारा आणि मुंबईला ‘भविष्यासाठी सज्ज’ करणारा एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचे महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे.