Who is Aarti Sathe : महाराष्ट्र भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे (Aarti Sathe) यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) न्यायाधीशपदासाठी शिफारस करण्यात आल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. निष्पक्ष न्यायव्यवस्थेची मागणी करत विरोधी पक्षांनी या नियुक्तीवर जोरदार आक्षेप घेतला आहे. (Who is Aarti Sathe)
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) कॉलेजियमने अजित भगवंतराव कडेठाणकर, आरती अरुण साठे आणि सुशील मनोहर घोडेस्वार यांच्या नावांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मान्यता दिली. या तिघांच्या नियुक्तीच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. यातील आरती साठे यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. आरती साठे या भाजपच्या नेत्या असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवर सर्वात आधी आक्षेप घेतला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले की, “एका राजकीय व्यक्तीची न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यामुळे न्यायव्यवस्थेच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयावर पुनर्विचार व्हायला हवा.” रोहित पवार म्हणाले की, केवळ न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक पात्रता असूनही एखाद्या राजकीय व्यक्तीची थेट नियुक्ती करणे योग्य नाही.
भाजप आणि साठे यांची भूमिका
या वादावर प्रतिक्रिया देताना आरती साठे यांनी आपण भाजप प्रवक्तेपदाचा राजीनामा (Resignation) खूप आधीच दिला असल्याचे स्पष्ट केले. “मी यापूर्वीच सर्व राजकीय पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता यावर काहीही बोलण्याची माझी इच्छा नाही,” असे त्या म्हणाल्या.
दुसरीकडे, भाजपने या वादाला उत्तर देताना आरती साठे यांनी गेल्या वर्षी 6 जानेवारी रोजीच पदाचा राजीनामा दिला होता, असे सांगितले. भाजपने त्यांच्या राजीनामा पत्राची प्रतही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
आरती साठे कोण आहेत?
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, आरती साठे यांनी आतापर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करकायद्याच्या क्षेत्रात प्रॅक्टिस केली आहे. त्या मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांचे वडील अरुण पी. साठे हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही (RSS) संबंधित आहेत. अरुण साठे यांनी 1989 मध्ये मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील दत्त यांच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.