महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये मतदान यादीत घोटाळा झाला का? राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग आक्रमक, दिले स्पष्टीकरण

Rahul Gandhi Allegations on Election Commission

Rahul Gandhi Allegations on Election Commission : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी Rahul Gandhi Allegations on Election Commission) यांनी मतदार यादीत (Voter List) फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींनी थेट पत्रकार परिषद घेत मतदार यादीतील घोटाळ्याचे कथित पुरावेच सादर केले. या आरोपांवर निवडणूक आयोगाने (Election Commission) स्पष्टीकरण दिले असून, हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. जर राहुल गांधी यांना त्यांचे आरोप खरे वाटत असतील, तर त्यांनी निवडणूक नियमांनुसार प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करून तसे जाहीर करावे. जर त्यांना स्वतःच्या आरोपांवर विश्वास नसेल, तर त्यांनी असे अवास्तव निष्कर्ष काढून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असे आयोगाने म्हटले आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, राहुल गांधी यांनी आरोप केला की, निवडणूक आयोगाने मशीन-रीडेबल मतदार यादी देण्यास नकार दिल्याने विरोधी पक्षांचा असा विश्वास आहे की, आयोगाने महाराष्ट्रातील (Maharashtra) निवडणुका चोरण्यासाठी भाजपसोबत (BJP) हातमिळवणी केली होती.

राहुल गांधी यांचे आरोप

दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील गेल्या 5 महिन्यांत वाढलेल्या मतदारांची संख्या आणि सायंकाळी 5 नंतर वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर त्यांनी संशय व्यक्त केला.

  • “महाराष्ट्रामध्ये 5 वर्षांच्या तुलनेत 5 महिन्यांत जास्त मतदार वाढले, ज्यामुळे आम्हाला संशय आला. त्यानंतर सायंकाळी 5 वाजेनंतर मतदानात मोठी वाढ झाली.”
  • “विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला, पण लोकसभा निवडणुकीत आमच्या आघाडीने जोरदार यश मिळवले. हे अत्यंत संशयास्पद आहे.”
  • गांधी यांनी असा दावा केला की, दोन्ही निवडणुकांमध्ये एक कोटी नवीन मतदार वाढले. “आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन लेखी तक्रार केली आणि आमच्या युक्तिवादाचे सार हे होते की, महाराष्ट्रातील निवडणुका चोरल्या गेल्या आहेत.”
  • मतदार यादी न देणे हा आयोगाचा ‘रेड फ्लॅग’ (Red Flag) आहे, असेही ते म्हणाले. “मतदार यादी ही देशाची संपत्ती आहे, तरीही निवडणूक आयोग ती देण्यास नकार देत आहे.”

याशिवाय, गांधी यांनी निवडणुकीच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) नष्ट करण्याचा आयोगाचा निर्णयही संशयास्पद असल्याचे म्हटले.

“साडेपाच वाजेनंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाले, असे आकडेवारीवरून दिसते. पण आमच्या कार्यकर्त्यांना माहित आहे की, मतदान केंद्रांवर असे काहीच घडले नाही. त्यामुळे ही दोन कारणे आम्हाला विश्वास देतात की निवडणूक आयोग भाजपसोबत निवडणुका चोरण्यासाठी हातमिळवणी करत आहे,” असे गांधी यांनी म्हटले.

गांधी यांनी कर्नाटकातील (Karnataka) एका लोकसभा मतदारसंघातील निवडणुका चोरीला गेल्याचा आरोपही केला आणि याला ‘संविधानावरील गुन्हा’ म्हटले. त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे 6 महिन्यांत जमा केलेले ‘व्होट चोरीचे’ ठोस पुरावे आहेत. यावर कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.