सरनाईकांच्या ‌‘गोविंदा‌’ला रॅपिडोची स्पॉन्सरशिप

Rapido sponsors Sarnaik's 'Govinda'


मुंबई- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी आयोजित केलेली प्रो-गोविंदा स्पर्धा आजपासून 9 ऑगस्टपर्यंत वरळीतील डोम येथे रंगणार आहे. या स्पर्धेसाठी बाईक सेवा कंपनी रॅपिडोकडून स्पॉन्सरशिप घेतल्याने सरनाईक वादात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी रॅपिडो या बाईक सेवा बेकायदेशीर असल्याने कंपनीवर कारवाईचे संकेत दिले होते. मात्र, ज्या रॅपिडोवर कारवाईची भाषा केली, त्याच कंपनीकडून त्यांच्या मुलाने स्पॉन्सरशिप घेतल्याचे उघड झाल्याने प्रताप सरनाईक वादात सापडले आहेत.
2 जुलै रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत एका अनधिकृत रॅपिडो बाईक टॅक्सीला रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी नसताना, त्या धावत असल्याचा आरोप करत सरनाईक यांनी कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. याशिवाय राज्याने नुकतेच ई-बाईक धोरण जाहीर केले असून, त्यानुसार केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या कंपन्यांना परवानगी मिळणार असल्याचे सरनाईक यांनीच सांगितले होते. आता रॅपिडो कंपनीकडूनच स्पॉन्सरशिप घेतल्याने विरोधकांनी सरनाईक यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
रोहित पवार एक्स पोस्टमध्ये म्हणाले की, रॅपिडो बाईक आली तेव्हा खुद्द परिवहन मंत्र्यांनीच अडवून त्यावर कारवाई केली. बातम्या झळकल्या, प्रसिद्धी मिळाली. पण आता त्या रॅपिडोशीच मांडवली करून त्यांच्या मुलाच्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप मिळाली. हे सरकार जनतेसाठी नसून स्वतःसाठी काम करत आहे, हे यावरून स्पष्ट होते. पण मला सरकारला विचारायचे आहे की, हा मंत्रिपदाचा गैरवापर तर नाही ना?
तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार उपरोधिक प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आधी एका खासगी ॲपवरून बाईक बुक करायची. मग गरीब बिचाऱ्या बाईकवाल्याला पकडायचे. ॲपवरून बाईक चालवणे नियमबाह्य आहे असा स्टंट करायचा, त्याचे व्हिडिओ बनवून परिवहन मंत्री किती स्मार्ट आणि अलर्ट आहेत असे दाखवायचे. आणि आणि नंतर त्या ॲपवाल्यांकडूनच इव्हेंटसाठी निधी घ्यायचा. किती छान कल्पना आहे. पैसे उभे करायचे असेल, तर मंत्र्यांना काय काय करावे लागते.